पत्त्यांचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:36 PM2019-09-24T15:36:13+5:302019-09-24T15:36:19+5:30

‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत ‘वास्तव’ या सदरात लिहिताहेत जळगाव येथील साहित्यप्रेमी कौस्तुभ परांजपे

Address left | पत्त्यांचा डाव

पत्त्यांचा डाव

Next

सकाळपासूनच माझी थोडी चुळबुळ सुरू होती. पण कोणाशी बोलावं काही कळत नव्हतं. बाबा दोन दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. नाहीतर त्यांच्याशी बोलून मन थोडं मोकळं करता आलं असतं.
मित्राच्या घरी त्यांचे थोडे घरगुती वाद झाल्याने त्याच्या घरचं वातावरण थोडं गढूळ झालं होतं. त्यामुळे मी थोडा अस्वस्थ होतो. म्हणून कोणाशी बोलावं या विचारात होतो. माझी ही चुळबुळ कदाचित आजोबांच्या अनुभवी आणि चाणाक्ष नजरेने हेरली असेल असे वाटते. कारण त्यांनी शांतपणे मला बोलावलं, समोर बसवलं आणि पत्याचा कॅट काढून पत्ते वाटून म्हणाले, बस, जरा दोन डाव खेळ, फ्रेश वाटेल आणि विचारांना दिशा मिळेल.
पत्ते लावताना ते जास्त काही बोलले नाहीत. मग हळूच म्हणाले, आपल्याकडे असलेल्या पत्त्यांमधून आपण चांगला डाव लावण्याचा प्रयत्न करत असतो. सगळे डाव चांगलेच येतात असे नाही. काही चांगले असतात, लवकर लागतात. काही थोडे अवघड असतात. उशिरा लागतात. पण लागतात हे नक्की. त्यासाठी आवश्यक त्या पत्यांची जुळवाजुळव करावी लागते. काही पत्ते सोडावे लागतात, तर काही टाकलेले किंवा ओढून उपयोगात येतील का? हे बघावे लागते.
आपल्या आयुष्यात रोज उगवणारा दिवस असाच पत्याच्या डावासारखा आहे. काय सोडावे आणि काय धरावे याचा शांतपणे आणि योग्य विचार केल्यास रोजचा डाव चांगल्या पद्धतीने सोडवण्यास मदत होते. काही वेळा डावामध्ये आपण हुकूमसुद्धा बोलतो. आपल्याकडे भारी असलेले पत्ते हुकूमाच्या हलक्या पानापुढे निष्प्रभ ठरतात. पण यातूनच सावरायचे असते आणि पुढच्या चांगल्या डावाची प्रतीक्षा करायची असते.
हे सगळे बोलून होईपर्यंत आमचे दोन डाव झाले होते. मग ते शांतपणे म्हणाले, दोन डावात तुझ्या लक्षात आले का? आपल्याकडून काही पत्ते सोडले जातात, काही टाकले जातात, तर काही दिले जातात.
जे सोडतो ते दोघांच्याही उपयोगाचे नसतात. जे टाकतो ते कदाचित थोड्या कालावधीनंतर उपयोगात येणार असतात. असे पत्ते समोरचा उचलतो आणि जे देतो ते हमखास लगेचच उपयोगी आणि डाव लागायला कारणीभूत असतात व बऱ्याच वेळा आपल्याला हे माहितीसुद्धा असते.
आपल्या रोजच्या जीवनातही येणाºया प्रसंगात देण्याची वृत्ती असावी. त्याने समस्या सुटायला मदत होते. ज्या गोष्टी अपायकारक किंवा निरूपयोगी आहेत त्या सोडून द्याव्यात. ज्या गोष्टींचा त्याग आत्ता केलातर चांगलेच होणार आहे त्या टाकून द्याव्यात.
जेव्हा कोणाला संसारात, मैत्रीत साथ हवी असते त्यावेळी एकमेकांचा डाव लागेल असेच पत्ते (विचार, मदत, संयम, धैर्य) द्यावे. त्यामुळे आपला किंवा त्याचा डाव लागण्यास मदत होते. येथे एकमेकांशी स्पर्धा, ईर्ष्या असता कामा नये. स्पर्धेत मी नाही तर तीसुद्धा नाही, असा विचार असतो. पण रोजच्या डावात असा विचार ठेऊन चालत नाही.
प्रत्येक डाव लागण्यासाठी थोडा वेळ हा द्यावाच लागतो. तुमच्या पिढीचा हाच त्रास आहे. तुम्हाला लगेचच निकाल अपेक्षित असतात. थोडा संयम ठेवण्याची वृत्ती तुमच्याकडे नाही. जुळवाजुळव किंवा काही अंशी तडजोड तुम्ही सहज स्वीकारत नाही. त्यामुळे मीच आणि माझेच बरोबर, असा ग्रह कदाचित निर्माण होऊन डाव विस्कटण्याची शक्यता असते.
आता शांतपणे विचार कर आणि निर्णय घे. म्हणजे तुझी चुळबुळ थांबेल.
आता मात्र मी मित्राकडे जाऊन शांतपणे सगळे ऐकून व समजावून घेईन व काय सोडायचे, काय टाकायचे व कोणी व काय द्यायचे हे ठरवून त्याचा डाव व्यवस्थित लावून देईन याबद्दल माझी खात्री झाली आहे. धन्यवाद आजोबा. पत्याच्या डावातून देणं, घेणं, सोडणं, जुळवणं व देणं घेणं व संयम दाखवणं हे शिकवल्याबद्दल, असे मी म्हणालो आणि मित्राकडे त्याचा डाव सावरायला बाहेर पडलो.
-कौस्तुभ परांजपे, जळगाव

Web Title: Address left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.