यंत्रणेत पुरेसे बेड, लसीकरणाची गती आणखी वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:05+5:302021-03-07T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिस्तीचे पालन न होणे, मोठ्या गर्दीत होणारे विवाह सोहळे यामुळे कोरोना वाढण्याची कारणे आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिस्तीचे पालन न होणे, मोठ्या गर्दीत होणारे विवाह सोहळे यामुळे कोरोना वाढण्याची कारणे आहेत. प्रशासनाकडे पुरेसे बेड व वैद्यकीय यंत्रणा सतर्क आहे, शिवाय लसीकरणाची गतीही वाढविण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी गाफील न राहता, नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी केले आहे. त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत कारणे व आगामी उपाययोजना सांगितल्या.
प्रश्न : कोरोना अचानक का वाढला?
डॉ. चव्हाण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जी शिस्त हवी होती, मध्यंतरी ती पाळली गेली नाही. कोरोना गेलाय असे समजून लोक एकदम रिलॅक्स झालेले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क या गोष्टींचे पालन होत नव्हते. मध्यंतरी दीड ते दोन हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे झाले. या प्रमाणे सर्वात गंभीर म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वावर वाढला होता. ज्या भागात कोरोनाचा संसर्ग अधिक त्या भागातूनही वावर सुरूच होता, अशा तीन ते चार कारणांनी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
प्रश्न : आता उपाययोजना काय?
डॉ. चव्हाण : पूर्वीप्रमाणेच आता थ्री ट्री अर्थात ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट लवकर निदान, लवकर उपचार यामुळे पुढील धोके तर टळतात; पण संसर्ग रोखता येऊ शकतो. यासह आपल्याकडे आधी कोविड केअर सेंटरमध्ये ९६९७, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १,३१० आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १,०१७ बेड उपलब्ध आहेत. सध्या ४,१२६ ॲक्टिव्ह केसेस असून त्यापैकी होम आयसोलेशनमध्येच अधिक आहेत. मात्र, तरीही बेडची आपल्याकडे कमतरता नाही. होम आयसोलेशनसाठी निकष तपासून व सौम्य लक्षणे किंवा लक्षणे विरहित रुग्णांनाच परवानगी दिली जाते. या रुग्णांची नियमित तपासणी होत असते.
प्रश्न : प्रलंबित अहवालांची संख्या प्रचंड वाढली आहे, यावर काय उपाय?
डॉ. चव्हाण : स्थानिक लॅबची क्षमता ही दररोजची १ हजार तपासणीची आहे. आपल्याकडे चार ते साडेचार हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या वाढली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आता खासगी लॅबकडे आपण तपासणीसाठी नमुने पाठवित आहोत. २४ तासात अहवाल मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आधी ८५० रुपये दर होता तोच आता ५५० रुपये आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अहवाल स्पष्ट होतील.
प्रश्न : लसीकरणाची परिस्थिती कशी?
डॉ. चव्हाण : ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. यात आपण शहरातील आठ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू केले आहे. काहींची पासवर्डची अडचण असल्याने त्यावर मार्ग काढण्यात येणार आहे. सोमवारपासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा पहिला टप्पा मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर सामान्यांना लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
कोट
हा स्ट्रेन आहे की नाही, याच्या तपासणीसाठी आपण प्रयोगशाळेला पत्र लिहून बाधित अहवालांपैकी पाच टक्के अहवाल एनआयव्ही पुणे येथे पाठविण्याचे सांगितले आहे. कोरोना कोणताही असला तरी काळजी व नियम आपल्याला पाळायचेच आहेत. औषधोपचांराचा प्रोटोकॉलही तोच आहे. मात्र, विलगीकरण हे त्यात महत्त्वाचे आहे. संसर्ग थांबवायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळावेत.
डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक