मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचा अंतर्धान सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:08 PM2020-05-17T17:08:35+5:302020-05-17T17:10:07+5:30
पुष्पवृष्टी करण्यापूर्वी जगात जी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महामारी पसरलेली आहे त्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी कीर्तनातून संत मुक्ताबाईला साकडे घालण्यात आले.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : खान्देशच्या आराध्यदैवत आदिशक्ती मुक्ताबार्इंचा सातशे चोविसावा अंतर्धान सोहळा रविवारी श्रीक्षेत्र कोथळी व नवीन मुक्ताई मंदिरात पार पडला. विशेष म्हणजे एकाच वेळेस महाराष्ट्रात चारही भावंडांच्या म्हणजेच आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव व सोपानदेव संस्थानच्या ठिकाणी हा सोहळा पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला.
कोथळी येथे सकाळी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते अभिषेक तर संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील व प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सकाळी मुक्ताई विजय ग्रंथ पारायण करण्यात आले. त्यानंतर मुक्ताई ग्रंथाचे पारायणदेखील करण्यात आले. मंदिराचे व्यवस्थापक हरी भक्त परायण रवींद्र हरणे महाराज यांचे कीर्तन झाले. कीर्तनादरम्यान दुपारी साडेबाराला पुष्पवृष्टी करून अंतर्धान सोहळा पार पाडण्यात आला.
तापीचीये तिरे महतग्रंथ असे सोमेश्वर पुरातन! हा अभंग हभप रवींद्र हरणे महाराज यांनी भाग घेतला. अभंगांमध्ये आदिशक्ती मुक्ताबाई चे कोथळी येथे आगमन व व रहिवास तसेच अंतर्धान या सर्व विषयांवर विस्तृत विवेचन केले. पंढरपूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसले असले तरी ज्याप्रमाणे अभंगांमध्ये पंढरपूर हे नीरा व भिमाच्या तिरी असा उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे संतांचे निवासस्थान हे ६५ कि.मी. परिघात व्यापलेले असते. त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई हीदेखील तापी तीरावर अंतर्धान पाहून त्याच ठिकाणी विसावली असल्याचा उल्लेख हरणे महाराज यांनी आपल्या अभंगातून केला. पुष्पवृष्टी करण्यापूर्वी जगात जी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महामारी पसरलेली आहे त्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी कीर्तनातून संत मुक्ताबाईला साकडे घालण्यात आले.
‘कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाली’ या शब्दांनी कीर्तनाची सांगता व मुक्ताई सेवा समर्पित करण्यात आली.
आदिशक्ती मुक्ताबाई चा अंतर्धान सोहळा केवळ मुक्ताईच्या वास असलेल्या कोथळी येथील मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिरातच आयोजित केलेला नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रात चारही भावंडांनी म्हणजेच निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव संस्थांतर्फेदेखील आज हा अंतर्धान सोहळा पार पाडण्यात आला.
पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज केशवदास नामदास यांचे कीर्तन मुक्ताई मठात पार पडले. विशेष म्हणजे हे कीर्तन मुक्ताई संस्थांच्या फेसबुकवर आॅनलाइन दाखवण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे निवृत्ती नाथांच्या मठामध्ये जयंत महाराज गोसावी यांचे कीर्तन होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली, तर संध्याकाळी संजय धोंडगे महाराज यांचे प्रवचन झाले. आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या संस्थानद्वारे गजानन महाराज लाहुडकर यांचे कीर्तन सेवा पार पडली. सासवड येथे गोपाळ गोसावी यांनी अंतर्धान सोहळा पार पाडला. कौंडण्यपूर येथे सर्जेराव देशमुख यांनी मुक्ताई अंतर्धान सोहळा पार पडला. विशेष म्हणजे दरवर्षी कौंडण्यपूर येथून अंतर्धान सोहळ्यासाठी पादुका या येत होत्या. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे ते शक्य नसल्याने तेथूनच आॅनलाईन उपक्रम सादर करण्यात आला. कोथळी येथील मंदिरावर व्यवस्थापन उद्धव महाराज जुनारे यांनी केले. खामनी, जि.बºहाणपूर येथील ग्रामस्थांनी नैवेद्य मुक्ताई चरणी अर्पण केले.
सोहळ्यासाठी उपस्थिती-
महंत संजयदास महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, हभप भोजेकर महाराज, नितीन महाराज मलकापूर, विशाल महाराज, विजय महाराज खवले, महादेव महाराज घोडके, मुकेश महाराज कळमोदा ,पंकज महाराज पाटील, हभप उद्धव महाराज जुनारे या संतांची उपस्थिती होती.