Aditya Thackeray: गुलाबरावांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे, क्रांती दिनीच तोफ डागणार
By विजय.सैतवाल | Published: August 5, 2022 02:59 PM2022-08-05T14:59:23+5:302022-08-05T15:00:11+5:30
मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर : शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघाला प्राधान्य
विजयकुमार सैतवाल
जळगाव : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदार संघातच हा कार्यक्रम होणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेदरम्यान ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये राज्यातील इतर जिल्ह्यापेक्षा जळगाव जिल्ह्यातील आमदारांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये जळगाव ग्रामीण (धरणगाव तालुका) मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे, मुक्ताईनगर मतदार संघाचे अपक्ष मात्र शिवसेनेसोबत असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. हे बंडखोर आमदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान ते वरील पाच पैकी गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांच्या मतदार संघात क्रांतीदिनीच जनतेशी संवाद साधरणार आहे.
जळगाव शहरात येऊन एकही कार्यक्रम नाही
आदित्य ठाकरे हे ९ रोजी मुंबई येथून सकाळी जळगाव विमानतळावर पोहचणार आहे. ते जळगाव शहरात येत असले तरी शहरात त्यांचा एकही कार्यक्रम नाही. शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात संवाद साधायचा असल्याने भाजप आमदार असलेल्या जळगाव शहराला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम
- सकाळी १०.१५ वाजता - जळगाव विमानतळावर आगमन. तेथून पाचोराकडे प्रयाण व सकाळी ११.२० वाजता पाचोरा येथे संवाद.
- दुपारी १२.१५ वाजता - पाचोरा येथून धरणगावकडे प्रयाण व धरणगाव येथे दुपारी १.४५ वाजता संवाद.
- दुपारी २.१५ वाजता धरणगाव येथून पारोळाकडे प्रयाण व दुपारी ३ वाजता पारोळा येथे संवाद.
- दुपारी ३.३० वाजता पारोळा येथून धुळ्याकडे प्रयाण.