चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:34+5:302021-06-05T04:12:34+5:30

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे ...

Administration fails to stop corona wave in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लाट रोखण्यात प्रशासनाला अपयश

Next

कोरोनाची दुसरी लाट प्रशासनाने खऱ्या अर्थाने गांभीर्याने घेतली होती काय? असती तर ही परिस्थिती ओढवली गेली नसती. असे संख्येवरून जाणवू लागले आहे. चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत एकूण ९ हजार ३७३ कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यापैकी १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आठशेपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाशी रुग्णालयात लढा देत आहेत, अशी भयावह परिस्थिती आहे. दररोज ही संख्या वाढतच आहे, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.

लोक उशिराने उपचारासाठी येतात, असे बोलले जात असले तरी दुसरीकडे मात्र चाचणी अहवाल उशिराने मिळणे, खाटा उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची कमतरता, औषधी न मिळणे अशी अनेक कारणे आहेत. ज्यामुळे रुग्णांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

सद्यस्थितीत प्रशासनाकडून कुठलीही प्रभावी यंत्रणा न राबविता केवळ लॉकडाऊनचे नियम व संचारबंदी अशा पर्यायांवर काम केले जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात जी प्रभावी यंत्रणा राबवली होती, ती यंत्रणा या टप्प्यात राबविताना दिसून येत नाही. फवारणी तसेच रुग्ण शोधमोहीम देखील केवळ नावालाच ठरत आहे. रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या नागरिकांचा शोध घेणे, प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष घालून तो परिसर सील करणे, अशी प्रभावी यंत्रणा कुठेही राबविताना दिसत नाही. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना याबाबत खबरदारी घेतली जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. पहिल्या टप्प्यात गल्लोगल्लीमध्ये फवारणी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढली असतानाही अनेक भागांमध्ये फवारणी करताना पाहायलाही मिळाली नाही. स्वच्छता, साफसफाई केली जात नाही.

कोरोना महामारीमुळे बेड्‌स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधे व चाचण्यांसाठी मदतीच्या याचनाही सोशल मीडियाद्वारे केल्या आहेत. औषधी काळ्याबाजारात विकली जात आहेत. लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे सामान्य जनतेसाठी सातत्याने कान उपटले पाहिजेत, प्रशासकीय यंत्रणेतील दोष निर्मूलन करून सुधारणा व्हायला हव्यात. मात्र, या तालुक्यात तसे घडले नाही. त्यामुळे ‘बुडत्याचे पाय खोलात’, अशी भयावह परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. त्यासाठी निष्क्रिय यंत्रणेचा बेंड काढून अचूक नियोजनाची संजीवनी देऊन चाळीसगाव तालुका यातून वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महसूल, पोलीस, नगरपालिका व आरोग्य विभागाचा समन्वय झाल्याशिवाय कोरोनावर मात करणे अवघड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

चाळीसगाव वार्तापत्र

Web Title: Administration fails to stop corona wave in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.