लसीचा एक-एक डोस वाचविण्यासाठी प्रशासनाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:17 AM2021-05-12T04:17:10+5:302021-05-12T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या वयोगटासाठी सुरुवातीला शहरातील चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या वयोगटासाठी सुरुवातीला शहरातील चार केंद्रांवर प्रत्येकी २०० याप्रमाणे लसीकरण होत होते. मात्र, दोन दिवसात याचे पूर्ण नियेाजन बदलले आहे. बऱ्याच केंद्रांवर बुकिंगपेक्षा कमी लाभार्थी लस घ्यायला येत असल्याने लस वाया जाण्याची भीती आहे, मात्र, प्रशासन याबाबत सतर्क असून एक एक डोस वाचविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे लसीकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरुवातीचे काही दिवस केवळ शहरात केंद्र होते. मात्र, लस उपलब्ध होताच आरोग्य केंद्रांनाही हे लसीकरण उपलब्ध करून देेेण्यात आले, मात्र यात बाहेरचेच लोक लसीकरणाला येत असल्याने केंद्रांवरील परिस्थिती थेट हाणामारीवर गेली होती. त्यामुळे अखेर हे केंद्र बंद करून शहरात केवळ दोनच केंद्र सुरू ठेवण्यात आली असून उर्वरित केंद्र हे ४५ वर्षाहून अधिक वयोगटांसाठी ठेवण्यात आली आहेत. केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी हे नियाेजन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला किती डोस आले - ३३०००
१८ ते ४४ वयोगटासाठी किती- ८०००
४५ पेक्षा अधिक वयोगटासाठी - २५०००
सकाळी चार वाजेपासून रांगा
लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर अगदी पहाटेपासूनच रांगा लागत आहेत. यात काही केंद्रांवर तर पहाटे चारपासून काही नागरिक रांगा लावत आहेत. यात १८ ते ४४ वयोगटासाठी वेळ ठरवून दिलेली असतानाही हे लाभार्थी पहाटेपासून केंद्रांवर येत असल्याने गर्दी वाढत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांनी दिलेल्या वेळेनुसार आल्यास गर्दी होणार नाही, त्यांनी त्या वेळेतच यावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
वेस्टेजचाही वापर
शासनाकडून लस देत असताना तीन टक्के वाया जातील या हिशेबाने पाठविलेल्या असतात मात्र त्याही आपण स्थानिक पातळीवर वाया जाऊ देत नाहीत, त्यांचाही पुरेपूर वापर केला जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी संगितले.
असे डोस असा वापर
कोविशिल्डचे आजपर्यंत आलेले डोस ३ लाख ३० हजार २८०
कोविशिल्डचे आजपर्यंत झालेले लसीकरण ३ लाख २२ हजार ७०
कोव्हॅक्सिनचे आलेले डोस ४४ हजार ९४०
कोव्हॅक्सिनचे झालेले लसीकरण ४० हजार १४०