जळगाव जिल्ह्यातील ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता; पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा
By विलास बारी | Published: September 23, 2023 05:41 PM2023-09-23T17:41:59+5:302023-09-23T17:43:57+5:30
जिल्हा प्रशासनाच्या सांघिक कामकाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले आहे.
जळगाव- जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६ हजारांच्या (५०टक्के) कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कमी कालावधीतच ३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणारा जळगाव जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. या सर्व शंभर टक्के कामांच्या तांत्रिक मान्यता घेण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सांघिक कामकाजाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी कौतुक केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांच्या कामकाजाबाबत आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिलेल्या प्रशासकीय मान्यतांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मध्ये २२५ कोटी ४३ लाख २९ हजार रूपये, अनुसूचित जाती उपयोजना ७८ कोटी ४१ लाख, आदिवासी उपयोजनामध्ये (टीएसपी/ओटीएसपी) ४८ कोटी ३७ लाख ६७ हजार रूपयांच्या प्रशासकीय देण्यात आल्या आहेत.