जळगावात पाणी भरताना विद्युत पंपाचा धक्का लागून प्रौढाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 PM2020-07-27T17:00:00+5:302020-07-27T17:00:26+5:30
पवार यांचे हरिविठ्ठल नगराच्या थांब्याजवळ सलून दुकान आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : नळाला आलेले पाणी भरत असतांना विद्युत प्रवाह उतरलेल्या विद्युत पंपाचा धक्का लागल्याने प्रकाश रामधन पवार (५६) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता हरिविठ्ठल नगरात घडली. पवार यांचे हरिविठ्ठल नगराच्या थांब्याजवळ सलून दुकान आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जुना आठवडे बाजार परिसरात प्रकाश पवार हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. पत्नी धुणीभांडीचे काम करत असल्याने त्या कामासाठी गेलेल्या होत्या. घरी पवार तसेच त्यांची वृध्द आई असे दोघेच होते. हरिविठ्ठल नगर परिसरात सोमवारी ११.३० वाजता पाण्याचा पुरवठा झाला, त्यामुळे पवार यांनी पाणी भरण्यासाठी विद्युत पंप सुरु केला. काही मिनिटातच या पंपातून नळी निसटली. ती पुन्हा लावत असतांना पवार यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात ते दूरवर फेकले गेले. शेजा-यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच याच परिसरात राहणारे भाऊ राजेंद्र पवार यांनी घटनास्थळ गाठले व त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
जामनेर तालुक्यातील भराडी येथील मुळ रहिवाशी असलेले प्रकाश पवार हे गेल्या १२ वर्षापासून हरिविठ्ठल नगरात जुना आठवडे बाजार परिसरात स्थायिक झाले होते. त्यांचे हरिविठ्ठल रिक्षा स्टॉपवर सलूनचे दुकान होते. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. त्यांच्या पश्चात आई सखुबाई, पत्नी शालीनी, मुलगा शुभम व भाऊ राजेंद्र पवार असा त्यांचा परिवार आहे. शुभम हा पुण्याला वास्तव्यास आहे.