पतीच्या संशयी स्वभावाबद्दल अॅड. राखी पाटील माहिती सांगत, महिला वकिलांनी जागविल्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:48 AM2019-01-17T00:48:02+5:302019-01-17T00:48:38+5:30
अर्धा दिवस काम बंद ठेवत श्रद्धांजली
जामनेर : सदैव हसतमुख व मनमोकळ्या स्वभाच्या अॅड. राखी पाटील या त्यांच्या मनातील भावना येथील न्यायालयातील महिला सहकारी वकीलांजवळ बोलून दाखविण्यासह पतीचा संशयी स्वभाव व त्यातून होणारे वाद याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यातून व्हायचा, असे त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकारी महिला वकीलांनी सांगितले.
अॅड. राखी पाटील यांना जामनेर न्यायालयात बुधवारी सकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व दुपारपर्यंत कामकाज बंद ठेवण्यात आले. यावेळी न्यायाधीश एम.एम.चितळे, न्या.सचिन हवेलीकर, न्या.ए.ए.कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.सुनील पाटील, वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य व न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.
अॅड. राखी पाटील यांनी विवाहानंतर मुलांची कौटुंबीक जबाबदारी सांभाळून सुरुवातीला एल.एल.बी. व नंतर एल.एल.एम. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. २०११ पासून त्या येथील न्यायालयात प्रॅक्टीस करीत होत्या. आपल्या हसतमुख स्वभावामुळे त्या सर्वांच्या आठवणीत राहिल्या. पतीसोबत त्यांचे वादविवाद होत असले तरी त्यांनी कधीही त्यांच्याबाबत तक्रार केली नाही.
राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देता यावी यासाठी त्यांनी पुणे येथे क्लास लावले होते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तत्पूर्वी त्या प्रशिक्षणासाठी नागपूरला दीड महिना होत्या. याकाळात एकदा त्यांच्या मोठ्या मुलाने फोनवरुन पप्पा कुणातरी महिलेला घरी घेऊन आल्याचे सांगितल होते. याबाबतदेखील त्यांनी विषय काढल्याचे त्यांच्या सहकारी महिला वकिलांनी सांगितले.
दरम्यान, अटकेत असलेल्या संशयित डॉ.भरत पाटील यांना चौकशीसाठी बुधवारी जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांसह फॉरेंसिक व ठसे तज्ज्ञांनी पाटील यांच्या घरात जाऊन तपासणी केली.
घटनेनंतर डॉ.पाटील यांनी ज्या गाडीतून पत्नी राखी यांना बेलवाडी येथे नेले ती गाडी कोण चालवीत होता याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.
दरम्यान, घटनेच्या दोन दिवस आधी डॉ.पाटील शहरातील एका खाजगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयात नवीन चारचाकी वाहनाच्या खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांचा संबंधीत कर्मचाºयांशी वाद झाल्याचे समजले. ही चारचाकी ते कुणासाठी घेत होते, याचीही चर्चा शहरात सुरू आहे.