आठवडाभरात होऊ शकते कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रसिध्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:19 AM2021-09-22T04:19:14+5:302021-09-22T04:19:14+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून आठवठाभरात ही जाहिरात ...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून आठवठाभरात ही जाहिरात प्रकाशित होऊन इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
एप्रिल महिन्यापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची निवड प्रक्रिया प्रारंभ झाली. ८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत ‘कुलगुरू शोध समिती’ साठी सदस्य म्हणून खडगपूर आयआयटीचे प्रा.डॉ. विरेंद्र तिवारी यांच्या नावाची निवड झाली होती. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी कुलगुरू शोध समिती राजभवनाकडून गठीत करण्यात आली. यात समितीच्या अध्यक्षपदी जम्मू आणि काश्मिरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश महेश मित्तल तसेच सदस्य म्हणून डॉ. विरेंद्र तिवारी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान, आता गेल्या महिन्याभरात शोध समितीच्या चार बैठका झाल्या आहेत. समन्वयक डॉ. शामकांत भादलीकर यांच्याकडून विद्यापीठासंदर्भातील संपूर्ण माहिती समितीला देण्यात आली आहे. आता कुलगुरू पदासाठीची जाहिरात प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आठवडाभरात ही जाहिरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे़ जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर इच्छुकांकडून अर्ज मागविले जातील. त्यानंतर समितीकडे आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन अंतिम पाच संभावित कुलगुरूंची नावे कुलपती कार्यालयाकडे पाठवण्यात येतील. कुलपती स्वत: त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन कुलगुरू निवडीची घोषणा करतील.