विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले १२ तासानंतर बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:06 PM2018-11-25T22:06:32+5:302018-11-25T22:08:44+5:30
सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
फत्तेपूर ता.जामनेर : सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
गोद्री येथील कांतीलाल मिश्रीलाल तालेरा यांच्या शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पाच ते सहा वर्षे वयाचा बिबट्या रविवारी सकाळी आढळून आला. ही विहिर साधारण ४० ते ५० फूट खोल असून त्यात तीस फूट़ांपर्यंत पाणी आहे. बिबट्या पाण्यात बुडू नये, यासाठी वन विभागाच्या कर्मचा-यांनी विहिरीत लाकडाचे मोठे ओंडके टाकले. शेवटी त्याच्या सुरक्षेसाठी विहिरीत खाट टाकावी लागली. विहिरीत खाट येताच बिबट्या त्यावर जाऊन बसला. रविवारी रात्री ८़.३० वाजेच्या सुमारास वनविभागाने विहिरीत सोडलेल्या पिंजºयात बिबट्या अडकला आणि त्याला बाहेर काढण्यात आले. त्याच्या अवाढव्य शरीरावरुन तो नर बिबट्या असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शनिवारी रात्री सावजाचा पाठलाग करतांना बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी एस.आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.