तब्बल १८ वर्षांनंतर जुलै महिन्यात पारा ४० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:16+5:302021-07-07T04:21:16+5:30

पावसाळा आहे की उन्हाळा : जबरदस्त उकाड्याने नागरिक त्रस्त; १२ जुलैनंतरच मान्सून होणार सक्रिय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

After 18 years, the mercury rose to 40 degrees in July | तब्बल १८ वर्षांनंतर जुलै महिन्यात पारा ४० अंशांवर

तब्बल १८ वर्षांनंतर जुलै महिन्यात पारा ४० अंशांवर

Next

पावसाळा आहे की उन्हाळा : जबरदस्त उकाड्याने नागरिक त्रस्त; १२ जुलैनंतरच मान्सून होणार सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्याने नागरिकांना पावसाळ्यात उन्हाळा सुरू असल्याचाच भास होत आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचले होते. तब्बल १८ वर्षांनंतर जळगाव शहरात जुलै महिन्यात कमाल तापमान हे ४० अंशांवर पोहोचल्याच्या नव्या रेकॉर्डची मंगळवारी नोंद झाली आहे.

गेल्या दहा दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यातच वातावरणातील आर्द्रतेसोबतच तापमानातदेखील वाढ झाल्यामुळे जळगावकरांना गेल्या पंधरा दिवसांपासून असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे, तसेच जुलै महिन्यात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगातदेखील मोठी घट झाली आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी १० ते १५ कि.मी. वेगाने वारे वाहत असतात. मात्र, ६ जुलैपर्यंतच्या सरासरीचा विचार केल्यास ही सरासरी केवळ ४ ते ६ कि.मी. इतकीच आहे. त्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण ७६ टक्के आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यातच मंगळवारी पारा ४० अंशांपर्यंत पोहोचल्याने सध्याचा वातावरणापेक्षा उन्हाळ्याचेच वातावरण चांगले आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सरासरी तापमानात ६ अंशांची वाढ

जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३० ते ३४ अंश कमाल तापमानाची सरासरी असते. मात्र, यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात कमाल तापमानाच्या सरासरीत तब्बल ६ अंशांची वाढ होऊन ही सरासरी ३७ ते ४० अंशांपर्यंत पोहोचली आहे. २००३ मध्ये जुलै महिन्यात शहराचा पारा ४० अंशांवर पोहोचला होता. त्यानंतर २०१५ जुलै महिन्यात ३९.५, तर २०१८ मध्ये याच महिन्यात ३९.२ इतक्या तापमानाची नोंद झाली होती. २००३ म्हणजेच तब्बल १८ वर्षांनंतर जुलै महिन्यात शहराचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे.

१२ पासून पावसाच्या धारा

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत उकाडा कायम राहणार असून, त्यानंतर ८ जुलैपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण वाढेल आणि त्यामुळे तापमानात ४ ते ६ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. सोबतच मान्सून सक्रिय होईल. १२ जुलैनंतर जळगाव विभागात विविध ठिकाणी पावसाला सुरुवात होऊ शकते. मात्र, अंदाजे १५ तारखेपासून जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ नीलेश गोरे यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या २० वर्षांत जुलै महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान

२००२ - ३७ अंश

२००३ - ४० अंश

२००६ - ३६ अंश

२००८ - ३४ अंश

२०१० - ३४ अंश

२०१२ - ३४ अंश

२०१५ - ३९.५ अंश

२०१८ - ३९.२ अंश

२०२१ - ४० अंश

कोट..

हवेचा दाब कमी झाल्यामुळे मान्सूनला खंड पडला आहे. मात्र, येत्या आठवडाभरात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यात ढगाळ वातावरण नसल्याने व वाऱ्याचा वेगदेखील कमी आहे, त्यामुळे तापमानासोबतच उकाडादेखील वाढला आहे.

-नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ

Web Title: After 18 years, the mercury rose to 40 degrees in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.