२० दिवसांनंतर पुन्हा ‘वीकेंड’ला बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:01+5:302021-06-28T04:13:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध ...

After 20 days, the market is closed again on weekends | २० दिवसांनंतर पुन्हा ‘वीकेंड’ला बाजारपेठ बंद

२० दिवसांनंतर पुन्हा ‘वीकेंड’ला बाजारपेठ बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले व शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार २० दिवसांनंतर पुन्हा बंद झाले आहेत. रविवार, २७ जूनपासून याची अंमलबजावणी झाल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता. दोन महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा बाजारपेठ बंद झाल्याने व्यापारी वर्गदेखील हवालदिल झाले आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली व एप्रिल महिन्यापासून निर्बंध लागू झाले. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शहरातील महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट यासह सर्वच मार्केट व इतरही दुकाने बंद झाली होती. व्यवसाय बंद झाल्याने व्यापाऱ्यांसह दुकानांवर काम करणारे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले व दुकाने पुन्हा सुरू ठे‌वण्यासाठी विविध व्यापारी संघटना, व्यापारी बांधवांनी पाठपुरावा सुरू केला होता. या काळात दोन महिने दुकाने बंद राहिली.

पुन्हा बंदचे संकट

ब्रेक द चेनमध्ये संसर्ग कमी होत गेल्याने १ जूनपासून निर्बंध शिथिल करण्यात आले व अत्यावश्यक सेवेसह इतरही दुकानांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर कोरोनाच्या वर्गीकरणातील पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्हा असल्याने ७ जूनपासून अनलॉक होऊन सर्वच व्यवहारांना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत व्यवसायाची परवानगी मिळाली. यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र, दुकाने सुरू होऊन २० दिवस होत नाही तोच पुन्हा दुकाने बंद झाली. जिल्ह्यात कोरोना संसर्गापासून दिलासा मिळाला. मात्र, आता डेल्टा प्लसने चिंता वाढविली व पुन्हा निर्बंधाचे संकट ओढावले आहे. राज्य सरकारने सरसकट सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्यात टाकल्याने अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. यातही इतर व्यवहारांना केवळ सोमवार ते शुक्रवारपर्यंतच व्यवसायाची परवानगी राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.

जिल्हा प्रशासनाने काढलेल्या या आदेशाची रविवार, २७ जूनपासून अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी, रविवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत पुन्हा शुकशुकाट पाहायला मिळाला.

व्यापारी वर्ग संकटात

आठवड्यातील दोन दिवस व्यवसाय पुन्हा एकदा ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. त्यातही सोमवार ते शुक्रवार केवळ दुपारी चार वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू राहणार असल्याने संध्याकाळच्या वेळी होणारी मोठी खरेदीही ठप्प होणार आहे. शहरात दिवसभरापेक्षा संध्याकाळी खरेदीचे प्रमाण अधिक असते व त्याच वेळी नेमकी दुकाने बंद राहणार असल्याने आर्थिक घडी पुन्हा विस्कटण्याची भीती व्यापारी वर्गात आहे.

आठवडाभरानंतर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण अगदी कमी असले तरी केवळ महिनाभरापूर्वीच्या नमुन्यातून डेल्टा प्लसचे रुग्ण समोर आल्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आठवडाभरात पाहून संसर्ग असाच स्थिर राहिला अथवा कमी झाल्यास व्यवसायांना पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: After 20 days, the market is closed again on weekends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.