मुक्ताईनगरात १७ वर्षांनंतर खडसे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:56 PM2019-11-10T15:56:32+5:302019-11-10T15:58:33+5:30
जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली आणि महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी जागविल्या. आपल्याच पत्नी आणि मुलांच्या समक्ष या मित्रांनी आपले अंतरंग मांडून वातावरण कधी हळवे तर कधी हास्याच्या फवाऱ्यांनी अविस्मरणीय बनविले.
१९९९-२००२ मध्ये खडसे महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ४ नोव्हेंबर रोजी जुने मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर (कोथळी) येथे झाला. पदवी शिक्षणानंतर १७ वर्षांनी सर्व मित्र एकत्र आल्यानंतर सर्वांनी एकमेकांच्या परिवाराची, व्यवसाय, नोकरीबाबत माहिती जाणून घेतली.
या बॅचचे जवळपास बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक जण शिक्षण क्षेत्रात, उद्योग-व्यवसाय तसेच पारंपरिक पद्धतीने शेती यशस्वीपणे कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यानी शिकत असताना घडलेल्या घटनांची माहिती देवून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेस सर्वांच्या परिपक्वतेचा अनुभव आला. ज्ञानेश्वर भगत यांनी व्हॉटसअॅप ग्रुप तयार करून सर्व मित्रांना एकत्र आणले. मित्रांनी आपल्या जीवनात येणारे सुख दु:ख एकमेकांशी शेअर करण्याचे आवाहन केले. निरोगी आरोग्य जगण्यासाठी जीवनात मित्रांची खूप गरज असते. मित्र हे आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे घटक असतात, असे सांगितले.
संपूर्ण दिवसभर मेळाव्यानिमित्ताने लहान मुलांबरोबर मस्ती बालपण जगता आले. या स्नेहमेळाव्यास योगेश पाटील, नितीन सनान्से, शारंदा धांडे, जितेंद्र पाटील, प्रशांत बंडगुजर, किशोर महाजन, रूपाली लोखंडे, रंजना खाचणे, पुरूषोत्तम ठोसे, जयश्री खडके, रामकृष्ण पाटील, विनोद कांडेलकर, पंकज चौधरी, सोनाली सनान्से, प्रवीण नाफडे, रवींद्र सोनवणे, राजू पाटील, मंगला पाटील, देवेंद्र पाटील, विक्की राणे, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.
मेळावा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर भगत, योगेश पाटील, नितीन सनान्से, रामकृष्ण पाटील, राजू पाटील, जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.