सव्वा महिन्यानंतर सोने पुन्हा ६० हजारांच्या पुढे, चांदीही ७६ हजारांवर
By विजय.सैतवाल | Published: July 19, 2023 04:51 PM2023-07-19T16:51:49+5:302023-07-19T16:52:19+5:30
चांदीच्या भावातदेखील भाववाढ होऊन ११ मेनंतर ती पुन्हा ७६ हजारांच्या पुढे गेली आहे.
जळगाव : गेल्या महिन्यापासून ६० हजारांच्या आत असलेल्या सोन्याच्या भावात बुधवार, १९ जुलै रोजी ६५० रुपयांची वाढ होऊन ते ६० हजार २५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. सोबतच चांदीमध्येदेखील ६०० रुपयांची वाढ होऊन ती ७६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यापासून सोने-चांदीच्या भावात मोठी भाववाढ होऊन गेल्या महिन्यापर्यंत सोने ६० हजारांच्या पुढे होते. मात्र १४ जूनपासून त्याच्या भावात घसरण होऊन ते ६० हजारांच्या आतच होते. जून महिन्याच्या अखेरीस तर ते ५९ हजारांच्या आत आले होते. मात्र त्यानंतर भाववाढ होत जाऊन ते १९ जुलै रोजी ६० हजार २५० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. १८ रोजी ते ५९ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर होते. यात ६०० रुपयांची वाढ झाल्याने ते १३ जूननंतर आता पुन्हा एकदा ६० हजारांच्या पुढे गेले.
अशाच प्रकारे चांदीच्या भावातदेखील भाववाढ होऊन ११ मेनंतर ती पुन्हा ७६ हजारांच्या पुढे गेली आहे. १८ जुलै रोजी ७५ हजार ६०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १९ रोजी ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे १९ रोजी चांदी ७६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीला मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढले आहे. यामुळे सोने पुन्हा एकदा ६० हजारांच्या पुढे गेले.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशन, जळगाव.