अखेर धावडा डोहात पोहचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 08:50 PM2019-05-29T20:50:49+5:302019-05-29T20:51:16+5:30
धरणगावकरांना मिळाला दिलासा : मध्यम गुळ प्रकल्पाचे तीसरे आवर्तन
धरणगाव : शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पात्रातील धावडा डोहाचे पाणी संपत आल्याने चिंताग्रस्त झालेल्या पदाधिकारी व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शहरासाठी आरक्षित असलेले मध्यम गुळ प्रकल्पाचे पिण्याचे आवर्तन सुटल्यानंतर हे पाणी पाच दिवसात या धावडा डोहात पोहचले असून शहरवासीयांना जून अखेर पर्यत हे पाणी तारणार आहे.
शहराला अंतर्गत पाईपलाईन मुळे पाच झोनचे सत्तरावर उपझोन झाल्याने बारमाही बारा दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये दरवर्षी चांगलीच पाणी टंचाई भासते.मात्र यावर्षी उपनगराध्यक्षा अंजली भानुदास विसावे व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव चौनरी या:नी पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करुन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
जलसाठ्याचे पूजन व पाहणी
धरणातून सोडण्यात आलेले पाणी धावडा डोहात पोहोचल्यानंतर याची पाहणी पदाधिकाऱ्यांनी केली. उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी जलपूजन केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, ,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यअध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गट नेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, जितेंद्र धनगर, भगवान महाजन,नाना मराठे, पं.स.सदस्य आसाराम कोळी, नांदेडचे शाखा प्रमुख भैय्या पाटील, जयेश महाजन, नगर पालिकेचे कर्मचारी किशोर खैरनार आदी उपस्थित होते.