सहसंचालकांच्या आश्वासनानंतर डॉ. राणेंचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:17 AM2021-02-11T04:17:43+5:302021-02-11T04:17:43+5:30
लेवा एज्युकेशन युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात प्राचार्यपदावरून डॉ. एस. एस. राणे हे गेल्यावर्षी ३० ...
लेवा एज्युकेशन युनियन संचलित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात प्राचार्यपदावरून डॉ. एस. एस. राणे हे गेल्यावर्षी ३० एप्रिलला सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीच्या आधी नियमांनुसार संबंधित संस्थेने राणे यांना निवृत्तिवेतन व इतर लाभ मिळण्याबाबत उच्चशिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविणे गरजेचे होते. मात्र, लेवा एज्युकेशन संस्थेने वेळेत प्रस्ताव न पाठवा उशिरा पाठविला तसेच हा प्रस्ताव पाठविताना अपूर्ण कागदपत्रे जोडून प्रस्ताव पाठविला होता तर अपूर्ण कागदपत्रांबाबत उच्चशिक्षण विभागाने कुठलीही दखल घेतली नव्हती. हा प्रस्ताव उच्चशिक्षण विभागाकडेच धूळखात पडून होता. त्यामुळे राणे यांचे सेवानिवृत्ती वेतन दिवसेंदिवस रखडत असल्यामुळे, राणे यांनी न्याय मिळण्यासाठी १० फेब्रुवारीपासून जळगावातील उच्चशिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलनापूर्वी उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक सतिश देशपांडे यांनी राणे यांना निवृत्तीवेतनासाठी अपूर्ण असलेली कागदपत्रे लेवा एज्युकेशन संस्थेतून मागवून, निवृत्तीवेतनाचा रखडलेला प्रस्ताव मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राणे यांनी बुधवारी आपले आंदोलन स्थगित केले.
दरम्यान, सहसंचालकांनी तातडीने निवृत्तीवेतनाचा प्रस्ताव मार्गी न लावल्यास गुरुवारपासून पुन्हा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे राणे यांनी `लोकमत`ला सांगितले.