आश्वासनानंतर गाळेधारकांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:15 AM2021-03-08T04:15:54+5:302021-03-08T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील मुदत संपलेल्या अव्यावसायिक मार्केटमधील १६ गाळेधारकांनी महापालिकेच्या प्रशासनाविरोधात पुकारलेला संप मागे घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील मुदत संपलेल्या अव्यावसायिक मार्केटमधील १६ गाळेधारकांनी महापालिकेच्या प्रशासनाविरोधात पुकारलेला संप मागे घेतला आहे. रविवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाळधी येथे जाऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार असून, या बैठकीत तोडगा काढण्याचे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्यानंतर, गाळेधारकांनी दोन दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, माजी नगरध्यक्ष पांडुरंग काळे, राजस कोतवाल, पंकज मोमाया, तेजस देपुरा यांच्यासह महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, आदी उपस्थित होते. गाळेधारकांनी या बैठकीत कैफियत मांडली. तसेच जोपर्यंत शासनस्तरावर गाळेधारकांबाबत कोणताही निर्णय होत नाही, तोपर्यंत महापालिकेच्या प्रशासनाकडून कारवाई करण्यात येऊ नये अशी मागणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्यानंतर गाळेधारकांनी दोन दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
पालकमंत्र्यांनी केली आयुक्तांसोबत चर्चा
गाळेधारकांसोबत चर्चा झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. तसेच बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार असून, तोपर्यंत गाळेधारकांना दिलासा देण्याबाबत सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर याबाबत महापालिकेने निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान, गाळेधारकांकडे अनेक वर्षांपासून थकबाकी असून, न्यायालयानेही ही थकबाकी वसूल करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच हा प्रश्न प्रलंबित असल्याने महापालिकेचे नुकसान होत असून, शहरातील नागरिकांना सुविधा देण्यास अडचणी येत असल्याची वस्तुस्थिती आयुक्तांनी पालकमंत्र्याकडे मांडली. त्यानुसार आता याबाबत बुधवारनंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.
चार दिवसांत कोणतीही वसुली नाही
महापालिकेच्या प्रशासनाने गाळेधारकांना थकीत भाड्याची रक्कम भरण्यास सोमवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, चार दिवसांत एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम भरलेली नाही. त्यातच बुधवारी (दि. १०) याबाबत मुंबईत बैठक होणार असल्याने या बैठकीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेचे प्रशासन व गाळेधारक यांच्या नजरा मुंबईला होणाऱ्या बैठकीकडे लागल्या आहेत.
कोट
पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून, बुधवारी याबाबत नगरविकास मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. पालकमंत्र्यांना गाळेप्रश्नावर संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली आहे. थकीत रक्कम वसूल करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, शासनाच्या निर्णयानंतरच याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, महापालिका
कडकडीत बेमुदत बंदकाळात आम्हा सर्वांना वेगवेगळ्या संघटनांतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. त्या सर्वांचेसुद्धा मन:पूर्वक आभार आणि भविष्यातही अशीच सहकार्याची अपेक्षा राहील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासित केले असून, गाळेधारकांबाबत योग्य निर्णय शासनस्तरावर घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार आम्ही आमचा संप मागे घेतला.
- डॉ. शांताराम सोनवणे, अध्यक्ष, महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटना