ऑटो नगरानंतर आता मनपाच्या रडारवर भंगार बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:42+5:302021-07-21T04:12:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपली आहे. याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारी वृत्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजाराची मुदत संपली आहे. याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आहे. मनपा प्रशासनाने आता भंगार बाजारची जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी केली आहे. दोन दिवसात या ठिकाणच्या दुकानदारांना ८१ ब नुसार दुकाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्या जाणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. ऑटो नगरातील सर्व दुकाने ताब्यात घेतल्यानंतर आता मनपाने भंगार बाजाराची जागा ताब्यात घेण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.
अजिंठा चौकात महापालिका मालकीची जागा भंगार बाजाराला देण्यात आली होती. या जागेची मुदत दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे. तत्कालीन नगरपालिकेने ११७ जणांना ही जागा २० रुपये व १५ रुपये वार्षिक भाड्याने दिली होती. या जागेचा भाडे करारदेखील संपला आहे. तसेच भंगार बाजारामुळे वाहतुकीसदेखील अडथळा होत आहे. भंगार बाजाराची ही ९० हजार स्केअरफूट जागा असून, आजच्या बाजारमूल्यांप्रमाणे या जागेची रक्कम १० कोटींपेक्षा जास्त आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेतदेखील ठराव करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षात मनपाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपाने अखेर ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
सर्व दुकानदारांच्या सुनावणी पूर्ण
भंगार बाजाराची जागा घेण्याआधी मनपाने या ठिकाणी व्यवसाय करत असलेल्या ११७ जणांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच महासभेनेदेखील ही जागा ताब्यात घेण्याबाबत ठराव झाल्यानंतर आता मनपानेदेखील सर्व दुकानदारांसाठी ८१ ब च्या नोटिसा तयार केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या आठवड्यात सर्व नोटिसा दिल्या जाणार असून, दुकानदारांना आपले साहित्य घेऊन जाण्यास ठरावीक मुदत देण्यात येणार आहे. मात्र, मुदतीत जागा खाली न झाल्यास मनपाकडून ही जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
कारवाई टाळण्यासाठी प्रशासनावर दबाव
भंगार बाजाराची कारवाई अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. आता ही मनपाने कारवाईच्या हालचाली सुरू करताच काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून ही कारवाई टाळण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन या दबावापुढे झुकते की कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.