केळीनंतर आता कजगाव परिसरातील रसाळ पपईची दिल्लीवारी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:51 PM2017-12-12T18:51:09+5:302017-12-12T18:54:16+5:30
घटलेले पजर्न्यमान, व भूगर्भातील खालावलेल्या जलपातळीमुळे जळगाव जिल्हय़ातील कजगाव ता. भडगाव परिसरातील भारतभर प्रसिद्ध गोड आणि मधुर चवीच्या केळीवर संकट आले असून लागवडीत घट झाली आहे. तिची जागा आता पपईने घेतली असून परिसरातून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघू लागले आहे. ही रसाळ पपई दिल्लीकरांनाही भावली असून तिला चांगली मागणी होत असल्याने पपई उत्पादकांचा हुरूप वाढला आहे.
ऑनलाईन लोकमत कजगाव, जि. जळगाव, दि.12 : संपूर्ण भारतात केळीसाठी प्रसिध्द असलेल्या कजगाव ता. भडगाव येथील केळी अनेक अडचणींमुळे लोप पावत असतानाच परिसरातील बागायतदार शेतकरी कजगावचे फळ उत्पादनातील अस्तित्व कायम टिकावे, कजगावच्या गोड केळीची जागा कोणत्या तरी फळाने घ्यावी व या गावाचे नाव दिल्लीतही सातत्याने झळकत रहावे या विचाराने परिसरातील बागायतदार पपई लागवडीकडे वळले आहेत आणि त्यामुळे केळीची जागा आता कजगावची मधूर पपई घेऊ लागली आहे. ही पपई दिल्लीकरांनाही पसंत पडली असून तेथे ती भाव खात आहे. कजगावची केळी संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. या परिसरातून दररोज 20 ते 25 रेल्वे व्ॉगन व 30 ते 40 ट्रक केळी माल येथून दिल्ली, कानपूर, मुंबई, पुण्यासह भारतातील प्रमुख शहरात पाठविण्यात येत होता. कजगावची ही प्रसिध्द व गोड केळी दिल्लीच्या धक्क्यावर पोहचण्यापूर्वीच विकली जायची. मात्र केळीच्या या वैभवाला दृष्ट लागून काही ना काही कारणामुळे ती लोप होऊ पहात आहे. याला कारण सातत्याने भूगर्भातील खालावणारी जलपातळी, घटलेले पजर्न्यमान, लागवडीचा वाढलेला खर्च, त्या तुलनेत येणारे कमी उत्पन्न, केळी भावातील चढउतार, मजुरांची वाढलेली मजुरी, बंद पडलेला कजगावचा रेल्वे मालधक्का अशा एक ना अनेक कारणांमुळे कजगावची केळी संकटात सापडली आहे. पर्याय म्हणून पपईला पसंती संकटांमुळे केळी लागवड सातत्याने कमी होत असल्याने बागायतदार शेतकरी आता फळशेतीकडे वळले आहे. यात लिंबू, मोसंबी, डाळींबची लागवड वाढली आहे. साधारण 3 ते 4 वर्षानंतर उत्पन्न सुरू होते म्हणून पपईची आंतरपीक म्हणून लागवड केली जात आहे. या भागात अनेक शेतक:यांनी पपई लागवड केली आहे. विशेष म्हणजे या पपईची चव मधूर अशी आहे. अत्यंत गोड अशा या पपईला सर्व स्थरातून मागणी वाढत आहे. बागायतदारांना यामुळे हुरूप आला असून म्हणूनच त्यांनी कजगावची ही पपई आता दिल्लीकडेही रवाना करणे सुरू केले आहे. दिल्ली दरबारी देखील तिला पसंती मिळू लागली आहे.