मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर जळगावातील गाळेधारकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:09 PM2018-03-23T23:09:04+5:302018-03-23T23:09:04+5:30
मंत्री,आमदारांसह शिष्टमंडळाने पुन्हा घेतली भेट
जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांच्या विषयावर विधानसभेत निवेदन केल्यानंतरही जळगावातून मुंबईत गेलेल्या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी सायंकाळी तसेच शुक्रवारीही पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी या शिष्टमंडळाला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर जळगावात चार दिवसांपासून सुरु असलेले बेमुदत बंदचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निंबूपाणी घेऊन उपोषण सोडण्यात आले. तसेच नागरिकांची आणखी गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलन मागे घेतल्यानंतर शहरातील ४ दिवसांपासून बंद असलेली २० मार्केटमधील दुकाने दुपारी ४ वाजेपासून उघडली.
सकाळपासून आमरण उपोषण
शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय घेत जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे शुक्रवारपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवार, २३ रोजी सकाळी आमरण व साखळी उपोषणासाठी नाव नोंदविलेल्या गाळेधारकांसह सर्वच गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मंडपात जमून उपोषणास प्रारंभ झाला.
मुख्यमंत्र्यांसोबत झाली पुन्हा चर्चा
दरम्यान जळगाव शहर मार्केट गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी सकाळी १० वाजता विधानभवन परिसरात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या मागण्यांचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल, गाळेधारक संघटनेचे हिरानंद मंधवाणी, रमेश मताणी, राजेश वरयाणी, दीपक मंधान उपस्थित होते. यावेळी गाळ्यांबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले होते. तसेच शुक्रवारीही जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवाणी आदींच्यासोबत गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची दोन-तीन वेळा भेट घेऊन चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन
शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. दीर्घ मुदतीसाठी भाडेपट्ट्यावर देण्यात येणाºया गाळेधारकांचे नुकसान होऊ नये आणि महानगरपालिकेचे आर्थिक हित जोपासले जावे यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल. मात्र गाळेधारकांनी आंदोलन मागे घ्यावे. आंदोलन मागे न घेतल्यास मदत करू शकणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची माहिती गाळेधारकांचे प्रतिनिधी हिरानंद मंधवाणी यांनी तसेच आमदार सुरेश भोळे यांनी कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांना दिली. डॉ.सोनवणे यांनी ही माहिती गाळेधारकांना देऊन चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले असताना व विधानसभेतही निवेदन केलेले असताना विश्वास ठेवावा लागेल, असे मत व्यक्त करीत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकाºयांच्या संपर्कात
गाळेधारकांच्या आंदोलनासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हाधिकाºयांशी फोनवरून संपर्कात होते. त्यामुळे गुरूवारी रात्रीही जिल्हाधिकाºयांनी या गाळेधारकांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलविले होते. त्यावेळी गाळेधारकांनी २०१२ ते २०१७ पर्यंत मनपाने पूर्वीच्या पद्धतीने काही टक्के भाडेवाढ करून ते भाडे स्विकारावे. २०१७ पासूनपुढच्या कराराचा निर्णय शासन घेईल, अशी मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकाºयांनी हा विषय त्यांच्या हातात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शुक्रवारीही गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने मनपात जाऊन महापौर व आयुक्तांना हे निवेदन दिले. मात्र महासभेत हा विषय अजेंड्यावर नसल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सूचना दिल्या. उपोषण मागे घेण्याचे ठरवल्यावर गाळेधारक कोअर कमिटीचे काही सदस्य जिल्हाधिकाºयांकडे गेले. त्यांना आंदोलन मागे घेण्याचा निर्णय सांगून सोबत घेऊन आले.
जिल्हाधिकाºयांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषणाची सांगता
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी येताच उपोषणकर्त्यांच्या मध्ये जाऊन बसले. गाळेधारकांशी संवाद साधत शांततेत आंदोलन केल्याबद्दल प्रशासनातर्फे आभारही मानले. त्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणास बसलेल्या गाळेधारकांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.