कापूस, सोयाबीननंतर आता केळीचेही मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:12 PM2019-11-09T19:12:17+5:302019-11-09T19:13:09+5:30
अनेक भागात हानी : वादळी पावसाने गाढोदा, कठोरा, किनोद भागात केळीला फटका
जळगाव : अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे केळीला कोणताही फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री तालुक्यातील गाढोदा, कठोरा, किनोद, भादली भागात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेले केळीचे घड कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकºयासमोर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व कापूसचेच नुकसान झाले होते. केळीला तसा जास्त पावसाचा फायदाच झाला होता. मात्र, अरबी समुद्रावर आलेल्या माहा चक्रीवादळाच्या परिणामस्वरुप गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. कठोरा, भादली, सावखेडा या भागात मोठे नुकसान झाले आहे. तर आव्हाणे, गाढोदा, पळसोद या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
केळीचे झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने तत्काळ उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांमध्ये जावून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कठोरा येथील शेतकरी गोकुळ मोहन जाधव यांनी केले आहे. गाढोदा परिसरात देखील निलेश रामचंद्र पाटील यांच्या केळीचाही बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कापूस काढण्यासाठी मोठी कसरत सुरु
शेतांमध्ये कापूस फुलला आहे अनेक ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या भागात कापूस शेतांमध्ये फुलला आहे. तो कापूस वेचताना शेतकरी व मजूरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातल्या त्यात कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये जरी पोहचले तरी चिखलामुळे पाय शेतांमध्ये रुतत असल्याने कापूस वेचणी करताना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे.