मृत्यूनंतरही आठवणी रुपी जगा, जळगावात आजीच्या उत्तरकार्यावेळी नातवाने केली देहदानाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:46 PM2018-03-15T12:46:34+5:302018-03-15T12:46:34+5:30
अनोखा संदेश
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपण सर्वांनी हे दान केल्यास आपल्यानंतरही दुसऱ्याला त्यातून जीवदान मिळू शकते व मृत्यूनंतरही आपल्या आठवणी समाजात राहू शकतात, असा संदेश देण्यात आला तो उत्तरकार्याच्या मंडपातून. निमित्त होते एका विशीतील तरुणाने आयोजित केलेल्या ‘देहदान : समज आणि गैरसमज’या विषयाच्या मार्गदर्शनाचे.
अजित अमरनाथ ठाकूर या युवकाच्या ९८ वर्षे वयाच्या आजी कलावती मदनलाल ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या उत्तरक्रियेच्या निमित्ताने ‘देहदान: समज आणि गैरसमज’ या विषयावर जनजागृती करावी या उद्देशाने त्याने आई-वडील आणि काका-काकू यांच्या प्रेरणेने या आगळ््या-वेगळ््या उपक्रमाचे खोटेनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
उत्तरक्रियेचे विधी सुरू होण्यापूर्वीच सकाळी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलेल्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ . प्रफुल्ल दकणे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सुमारे दोनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. देहाचे दहन करण्याऐवजी वैद्यकीय महाविद्यालाय दान केल्यास वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोग होतो. कोणतीही व्यक्ति कोणत्याही वयात एक साधा अर्ज भरून देहदानाचे ईच्छापत्र जवळच्या वैद्यकीय महाविद्यालाकडे देऊ शकते. अर्ज भरलेला नसला तरी नातेवाईकांनी या पवित्र दानाची इच्छा व्यक्त केल्यास मरणोत्तर दान करता येतेच, असेही डॉ . दकणे यांनी सांगितले.
दिग्गजांनी देहदान करून निर्माण केला आदर्श
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानाजी देशमुख, उद्योगपती शंतनू किर्लोस्कर, कवी विंदा करंदीकर अशा विविध क्षेत्रातील असंख्य महनीय व्यक्तींनी देहदान करीत समाजासमोर आदर्श ठेवण्याकडेही डॉ . दकणे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
पुणे येथील शलाका आणि त्यांचे पती पत्रकार डॉ. प्रा. किरण ठाकूर यांनी रक्तदान, नेत्रदान, आणि देहदान या चळवळींना गेल्या २० वर्षांपासून पाठिंबा दिला आहे. या दोघांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या उपक्रमाला रमेश चव्हाण, सुरेशचंद्र चव्हाण, अशोक ठाकूर, दिनानाथ ठाकूर, राघवेंद्र ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, अमरनाथ ठाकूर यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला पाठिंबा दिला. यावेळी चव्हाण -ठाकूर परिवारातील महिलाही या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.