पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर वारसांना करावा लागतो तांत्रिक अडचणीचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:35 AM2020-09-22T00:35:51+5:302020-09-22T00:36:10+5:30
रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
भुसावळ : शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाºया जुन्या पेन्शनधारकांना सातव्या वेतन आयोगातून बहुतांश समस्या सुटलेल्या आहेत, मात्र पेन्शनधारकाच्या विधवा महिलेची किंवा अविवाहित मुलींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रुटी दूर झाल्यास वृद्धापकाळात बँकेचे फेरे मारावे लागणार नाहीत.
जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाने २००५ पूर्वी असलेली जुनी पेन्शन लागू आहे व यानंतर पेन्शन योजनेत बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या पेन्शनधारकांना अंशत: समस्यांचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनधारक सदस्याच्या मृत्यूनंतर विधवा महिला किंवा अविवाहित मुलीला पेन्शन शासनाला देयक असते. यासाठी किचकट प्रक्रियेनंतर पेन्शन वारस महिला, मुलीच्या नावावर होते अर्थातच जे वारस असतात त्यांच्या नावावर पेन्शन करण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये मात्र वयोवृद्ध महिला व अविवाहित किंवा मतिमंद मुलींना फार त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने साधे सरळ नियम करून पेन्शन संबंधित कर्मचाºयांच्या वारसांच्या नावावर करणे अपेक्षित आहे व तशी अपेक्षा करण्यात येत आहे. तसेच रेल्वे कर्मचाºयांच्या वारसांना रेल्वेतर्फे प्रवासासाठी देण्यात येणाºया पास सवलतमध्येही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
जुन्या शासकीय पेन्शनधारक कर्मचाºयाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पेन्शन वारसांनी जन्मतारखेसह इतर शासकीय माहिती वेळोवेळी रेल्वेला अपडेट करावी. जेणेकरून वाढीव पेन्शनचा त्यांना लाभ घेता येईल.
-पुंडलिक जावडे, अध्यक्ष, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनर्स असोसिएशन, भुसावळ
जुन्या पेन्शन योजनेंतर्गत सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून ९० टक्के समस्यांचे निराकरण झाले आहे. मात्र पेन्शनधारकांच्या मृत्यूपश्चात वारसदारांना पीपीओ लवकर मिळावे, रेल्वे पासमध्ये किचकट प्रक्रिया न करता त्वरित उपलब्ध करून द्यावी.
-एन.आर.सरोदे, खजिनदार, आॅल इंडिया सेवानिवृत्त रेल्वे पेन्शनधारक असोसिएशन, भुसावळ
अविवाहित कर्मचारी सेवेत असताना त्याच्या पश्चात त्यांची अविवाहित बहीण किंवा घटस्फोट झालेली बहीण असेल तर त्यांनाही पेन्शनमध्ये वारस म्हणून मान्यता मिळावी. ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा चर्चासुद्धा झालेले आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी.
-राजेंद्र झा, अध्यक्ष, आॅडनस फॅक्टरी कामगार युनियन, भुसावळ
जुने पेन्शनधारक ज्यांचे वय सत्तरपेक्षा अधिक आहे त्यांच्या बोटाचे ठसे नीट उमटत नाहीत. त्यामुळे जुन्या रेकॉर्डशी जुळत नाहीत. त्यांना पेन्शन नाकारले जाते किंवा अर्ज करून विलंब लागतो. काही असाध्य आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनाही बँकेत येण्याची सक्ती केली जाते. पेंशन खाते दोघांच्या संयुक्त नावे नसते. त्यामुळे मृत्यनंतर वारसाला त्रास होतो. हयातीचा दाखला दिल्यावरही हयातीचा दाखला मागतात.
-प्र.ह.दलाल, ज्येष्ठ नेते, शिक्षक संघटना, भुसावळ