प्रसूतीनंतर जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यूू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:57 AM2018-05-22T11:57:52+5:302018-05-22T11:57:52+5:30
हलगर्जीपणाचा आरोप
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २२ - जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आरती नरेंद्र सोनवणे (वय-२१, रा़ आसोदा) या बाळंतीण महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटूंबियांनी सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालय प्रशासनाविरुध्द रोष व्यक्त केला़
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, आसोदा येथील आरती सोनवणे ही विवाहिता प्रसुतीसाठी चोपडा येथे माहेरी आल्या होत्या़ १८ रोजी चोपडा रूग्णालयात तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी शरीरात रक्त कमी असल्याचे कुटूंबियांना कळविले. त्यानंतर जळगाव जिल्हा रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला़ त्यानंतच त्याचदिवशी विवाहितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले व रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास विवाहितेची सिजेरीयन प्रसुती करण्यात आली.
साडे नऊ वाजता मृत्यू
दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आरती यांचा सोमवारी मृत्यू झाला़ आक्रोश करत रूग्णालयाच्या गलथान कारभाराविरूध्द कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली़ दरम्यान, तपासणीसाठी नियमित डॉक्टर येत नसल्याचे नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना सांगितले़
पोलिसात तक्रार देणार
हलगर्जीपणा केल्याबाबत पोलिसात तक्रार देणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ तसेच शवविच्छेदन करून मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात येणार आहे़ आरती यांच्या पश्चात वडील रमेश साळुंखे, आई वत्सलाबाई, भाऊ दीपक, पती नरेंद्र तसेच सासू-सासरे असा परिवार आहे़
प्रसूतीनंतर बिघडली प्रकृती
आरती यांची प्रसुुती झाल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर बाळंतणीला शस्त्रक्रिया विभागापासून अतिदक्षता विभागापर्यंत नेताना आॅक्सिजन देण्यात न आल्याने विवाहितेची प्रकृती अधिकच खालावली, असा आरोप नातेवाईकांनी केला़ त्या दिवसापासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाला असल्याने बाळंतीण मृत्यूशी झुंज देत होती़