शेतात दारु पिण्यास बसल्यावरुन कासोद्यात दोन गट भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:15 PM2020-06-06T20:15:43+5:302020-06-06T20:16:17+5:30
गुन्हा दाखल : १३ जणांना अटक
कासोदा- माझ्या जागेत दारु पिण्यास का बसले याचा जाब विचारुन रिकाम्या बाटल्या उचलायला लावल्याच्या कारणावरुन येथे .५ च्या रात्री दोन गट एकमेकांना भीडले. मोठा जमाव एका इमारती जवळ गोळा झाल्याने तणाव वाढला होता,मात्र तात्काळ पोलिसांच्या हस्तक्षेपाने मोठा अनर्थ टळला आहे.दोन्ही गटांच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल होऊन १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
५ रोजी रात्री तळई रस्त्यावरील शेतात काही जण दारू पीत बसले होते,शेतमालक वाल्मिक देविदास समशेर यांनी त्यांना हटकले व दारुच्या रिकाम्या बाटल्या उचलून फेकावयास लावल्या, आम्ही ज्या बाटल्या पिलो त्याच फेकू,आधीच्या पडलेल्या फेकणार नाही, यावरुन वाद वाढला व वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हा वाद पुन्हा घरी आल्यावर वाढला पण यावेळी समशेर यांच्या इमारतीजवळ मोठा जमाव जमला. इमारतीच्या दरवाजा व खिडक्यांंना दगड मारुन काचा फोडल्या, यावरून गावात अफवा पसरल्या. पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वाल्मिक देविदास समशेर यांच्या फियार्दीवरून भादंविक १४३, १४७, १४९, ३३६, ३२३, ५०४, ४२७, १८८,सह जमावबंदीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन इरफान मन्सूफ खान,अजमल मुक्तार खान,सह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर इरफान खान मुन्सब खान यांच्या फियार्दीवरून वाल्मिक देविदास समशेर, गणेश बाबूलाल अहिरे सह एकूण ५ जणांना अटक केली आहे. सहाय्यक फौजदार सहदेव घुले व पो.नाईक युवराज कोळी हे पुढील तपास करीत आहेत.या घटनेनंतर चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांनी घटनास्थळी भेंट देऊन शांतता समितीची तातडीने बैठक घेतली. यावेळी एपीआय रवींद्र जाधव,पीएसआय नरेश ठाकरे, हिंमत पाटील, भैय्या राक्षे,रवींद्र चौधरी मुक्तार पंजाबी,समद कुरेशी सह काही नागरिकांशी संवाद साधला व शांतता अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे.पण दारुमुळे जर संपूर्ण गावाची शांतता धोक्यात येत असेल तर संबंधीतांनी जास्त कठोर होणे गरजेचे आहे, अशी चर्चा गावात होत आहे.