आठ वर्षांनंतर अनुकंपाधारकांच्या भरतीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:19 AM2021-02-25T04:19:33+5:302021-02-25T04:19:33+5:30
लढ्याला मिळाले यश : सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला होता पाठपुरावा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्या सात ते आठ ...
लढ्याला मिळाले यश : सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला होता पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्या सात ते आठ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत मनपाच्या पायऱ्या झिजविणाऱ्या ९० अनुकंपाधारकांना अखेर न्याय मिळाला आहे. नगरविकास मंत्रालयाने याबाबतचे पत्र मनपा आयुक्तांना पाठविले असून, अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्याचा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच सेवा प्रवेश व आकृतीबंध अंतिम करण्याबाबत मनपा प्रशासनाने आवश्यक माहितीसह मंत्रालयात पाठविण्याचा सूचनाही नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
२०१३ पासून महापालिकेत अनुकंपाधारकांची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळे ९० अनुकंपाधारक गेल्या आठ वर्षांपासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. अनेकवेळा उपोषण, आंदोलनाचा मार्ग अवलंबूनदेखील अनुकंपाधारकांना न्याय मिळाला नव्हता. गेल्या महिन्यात अनुकंपाधारकांनी महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके यांची भेट घेऊन, हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. यासह राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडेही अनुकंपाधारकांनी आपले गाऱ्हाणे मांडले होते. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी अनुकंपाधारकांना न्याय मिळावा यासाठी स्थायी समितीतून सभात्याग केला होता. तर अनुकंपाधारकांनी देखील उपोषण मनपा प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले होते. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा व अनुकंपाधारकांनी दिलेल्या लढ्याला आठ वर्षांनंतर अखेर यश आले आहे. त्यामुळे लवकरच ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
कोट...
अनुकंपाधारकांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी सर्वपक्षातील पदाधिकाऱ्यांसह महापौर म्हणून आम्हीही पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने अनुकंपाधारकांची आर्त हाक ऐकली आहे. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांचा प्रश्न अखेरीस मार्गी लागला आहे.
-भारती सोनवणे, महापौर