यावल येथे कुटुंब बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी साधला डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:54 PM2020-01-13T22:54:31+5:302020-01-13T22:55:58+5:30
व्यास नगरातील जमील अब्दुल पिंजारी यांचे बंद घरही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले.
यावल, जि.जळगाव : येथील व्यास नगरातील जमील अब्दुल पिंजारी यांचे बंद घरही अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. शुक्रवारी शहरातील विविध भागातील एकूण पाच घरे चोरट्यांनी फोडली होती.
शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील व्यासनगर, कृष्णतारा नगरातील पाच घरे फोडली होती. त्यात व्यास नगरातील पिंजारी यांच्या घराचाही समावेश आहे. पिंजारी कुटुंब शुक्रवारी सायंकाळी चोपडा येथे गेले असता रात्री बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी पॅसेजमधील दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पिंजारी यांच्या आईची जुन्या काळातील सोन्याची पोत व सोन्याच्या बांगड्या असे पाच तोळे सोने लंपास केले. रविवारी सायंकाळी बाहेरगावावरून पिंजारी कुटुंब परतल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पाहून त्यांनी पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली.
पो. नि. अरूण धनवडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथक घराभोवती घुटमळले असल्याने चोरट्यांंचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र याच परिसरात असलेल्या एका शाळेतील सीसीटीव्ही कॅमेºयात एक अज्ञात मोटारसायकल फिरत असल्याचे कैद झाल्याने पो. नि. धनवडे यांनी पोलिसांना त्याबाबत तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शहरालगत असलेली नवीन वस्त्यातील घरे विखुरलेली असल्याने बंद घरे पाहून चोरटे संधी साधतात, असे निष्पन्न झाले आहे.