जळगावातील वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात अखेर दोषारोपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:28 PM2018-12-06T12:28:44+5:302018-12-06T12:29:09+5:30
माजी नगराध्यक्ष प्रदीप रायसोनींसह सहा जणांचा समावेश
जळगाव : दीर्घ प्रतीक्षेनंतर वाघूर पाणी पुरवठा योजनेतील अपहार प्रकरणात बुधवारी न्या. सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या दोषारोपपत्रात माजी नगराध्यक्ष प्रदीप ग्यानचंद रायसोनी, सिंधू विजय कोल्हे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, सदाशिव गणपतराव ढेकळे ,तत्कालिन मुख्याधिकारी पी.डी.काळे व तापी प्रिस्टेट या कंपनीचे संचालक मोतीलाल कोटेचा यांचा समावेश आहे. दरम्यान,कोटेचा यांचे निधन झालेले आहे.
तत्कालिन जळगाव नगरपालिकेच्या वाघुर पाणी पुरवठा योजनेत माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांनी ३० कोटीचा तात्पुरता व १२ कोटी रुपयांचा कायमचा अपहार केल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी केली होती. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनला जुलै २०१२ मध्ये गु.र.नं.६९/२०१२ भादवि कलम ४०४, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
तपासाधिकारी प्रशांत बच्छाव यांनी या गुन्ह्यातील संशयितांन ५ डिसेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्व संशयित सकाळी अकरा वाजेपासून हजर होते. दुपारी बच्छाव यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले. वाघुर पाणी पुरवठा योजनेचे काम मोतीलाल कोटेचा यांच्या तापी प्रिस्टेट या कंपनीला संगनमताने देण्यात आले होते. त्यासाठी २५ टक्के इतकी रक्कम विना व्याज अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली होती. त्यामुळे नगरपालिकेचे ६ कोटी १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.