जळगावात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने दोन तास अंत्यसंस्कार रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:00 PM2018-11-15T13:00:01+5:302018-11-15T13:01:06+5:30
मरणानंतरही स्मशानात ‘यातना’
जळगाव : जिवंतपणी असलेल्या यातनांचा शेवट हा मरणानेच होतो, असे म्हटले जाते मात्र मृत्यूनंतरही असुविधेच्या यातना अंत्यसंस्कार प्रसंगी भोगाव्या लागल्याची घटना येथे घडली. लाकडांअभावी दोन जणांचे अंत्यसंस्कार दोन तास रेंगाळले. हा प्रकार बुधवारी नेरीनाक्या जवळील स्मशानभुमीत घडला.
या ठिकाणचा लाकडांचा साठा संपल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना स्मशानभूमीत ताटकळत बसावे लागले. शेवटी नातलगांनी बाहेरुन लाकडे आणुन अंत्यसंस्कार केले. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांनी मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
काही वर्षापासून महापालिकेने अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत पुरविण्याची सेवा बंद केल्यानंतर नागरिक बाहेरुन लाकडे आणून अंत्यसंस्कार करत होते. बाहेरुन लाकडे आणतांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असे व वेळही वाया जात होता. याकरिता आमदार सुरेश भोळे यांनी काही दिवसांपासून नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील वखार मालकांना सांगून स्मशनभूमीत लाकडे उपलब्ध करुन दिली आहेत. यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी बाहेरुन लाकडे आणण्याचा त्रास वाचला आहे.
नागरिकांना लाकडे देण्यासाठी आमदार भोळे यांनी या ठिकाणी दोन व्यक्तींची नेमणुकही केली आहे. मात्र, बुधवारी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडे संपल्याने नागरिकांना बाहेरील वखारीतून लाकडे आणावी लागली. यात बराच वेळ गेल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनाही मनस्ताप झाला.
लाकडाची वाहतूक बंद केल्याने तुटवडा
नेरी नाका स्मशानभूमीत दर दोन ते तीन दिवसानंतर बाहेरुन लाकडांचा ट्रक येत असतो. तर कधी जळगावातील वखारीतून लाकडे येत असतात. बुधवारी स्मशानभूमीतील लाकडे संपल्यामुळे येथे काम करणाऱ्या राजू कोळी व मजीद जहागिरदार यांनी वनविभागाने बाहेरुन शहरात येणारी लाकडाची वाहतूक बंद केल्याने लाकडांचा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले. तसेच शहरातील वखार मालकानांही वनविभागाने स्मशानभूमीला लाकडे देण्याची परवानगी नाकारली असल्याने, अजुन एक आठवडा लाकडांची टंचाई भासणार असल्याचे सांगितले.
दोन अंत्यसंस्कारांना झाला विलंब
नेरी नाक्याजवळीलच रहिवासी शंकर कोळी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिकांनी शंकर कोळी यांचे पार्थिव सकाळी १० वाजता नेरी नाका स्मशानभूमीत आणले होते. या ठिकाणी लाकडे उपलब्ध करुन देणाºयांनी अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याचे सांगुन थोड्या वेळाने लाकडे येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मात्र, तासभर उलटुनही लाकडे न आल्याने नातेवाईकांनी कोळी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वनविभागातर्फे लाकूड व्यापाºयांच्या गाड्या अडविण्यात येत असल्यामुळे लाकडे येणार नसल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांनी शेजारीच असलेल्या वखारीतून लाकडे खरेदी करुन दुपारी १२ वाजता कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच दादावाडी येथील एका वयोवृद्ध महिलेचे सकाळी साडेअकरा वाजता पार्थिव आल्यावर त्यांनाही येथे लाकडे न मिळाल्याने बाहेरुन लाकडे आणून दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार करावे लागले.
वनविभागाने बाहेरुन शहरात होणाºया लाकडांच्या वाहतूकीवर बंदी घातली आहे. यामुळे शहरातील सॉ मिलला लाकडांची आवक कमी होत आहे. यामुळे त्यांच्याकडेच लाकडे नसल्याने त्यांनी स्मशानभूमीला लाकडे दिले नसतील. या संदर्भात गुरुवारी मुंबईहुन जळगावला आल्यावर, वनविभागाचे अधिकारी व स्मशानभूमीला लाकडे पुरविणाºया व्यापाºयांशी चर्चा करुन, लाकडांचा प्रश्न सोडवतो.
-सुरेश भोेळे, आमदार