चाळीसगावला पुरानंतर साफसफाईचे काम हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:35 AM2021-09-02T04:35:01+5:302021-09-02T04:35:01+5:30
ग्रामीण व शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथके तयार केली असून पंचनामे करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू ...
ग्रामीण व शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथके तयार केली असून पंचनामे करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या शिवाजी घाट, बामोशी बाबा दर्गाह परिसर, घाटरोडवरील जुना पूल, रिंगरोड, शनि मंदिर परिसर, काकडे गल्ली, पीर जिंदा शहा बाबा दर्गाह परिसर, नवीन पूल, दयानंद हॉटेल समोरील व्यापारी संकुल, दोस्त चित्रमंदिर परिसर, भीम नगर परिसर आदी भागांमध्ये न. पा.च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ८ वाजताच स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
जेसीबीच्या सहाय्याने गाळ गोळा करण्यात येऊन फायर फायटरच्या पाणीपंपाने स्वच्छता केली गेली. शिवाजी घाट परिसरात स्वच्छता सुरू असताना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी पाहणी करून आढावा घेतला. तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष तयार करण्यात आला असून नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, सचिन निकुंभ, दिलीप चौधरी राहुल निकम, शशिकांत जाधव, शिवदास जाधव, राकेश जाधव, विजय जाधव आदींसह ३५० कर्मचारी स्वच्छता करीत आहे.
चौकट
नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने पुराने नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याने यासाठी पथके तयार करण्यात आली आहे.
१...शहरातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकात चार कर्मचारी आहेत.
२...ग्रामीण भागातील शेतीसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे नोंदविण्यासाठी १२५ कर्मचारी नेमण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासूनच पंचनाम्यांनाही सुरुवात झाली आहे.
चौकट
स्वच्छतेसाठी एनसीसी पथकाची मदत
शहरातील पुराने निर्माण झालेल्या घाणीची स्वच्छता करण्यासाठी चाळीसगाव महाविद्यालयातील एनसीसी पथकाची मदत घेण्यात आली आहे. या पथकात ४० विद्यार्थी सहभागी झाले आहे. पथकाने स्वच्छतेचे काम सुरू केले असून यावेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, व्ही. एच. पटेल प्रा. वि.चे चेअरमन व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, डॉ. अजय काटे, प्रा. राजेश चंदनाशिव आदि उपस्थित होते.