गिरणा मायीची एक तपानंतर भरली खणा नारळाने ओटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 08:02 PM2019-10-06T20:02:54+5:302019-10-06T20:05:49+5:30
गिरणा मातेचे ऋण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथे गिरणामातेचा जलपूजन सोहळा थाटात पार पडला.
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : गिरणा नदीला तब्बल १२ वर्षांनंतर पुराचे पाणी आल्याने यंदा गिरणा नदी दुथडी भरुन वाहिली. पाणीटंचाई दूर झाली. नागरिक आनंदाने भारावले. एक तपानंतर गिरणा मायीची खणा नारळाने भरली ओटी. गिरणा मातेचे ऋण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भडगाव तालुक्यातील वाडे येथे गिरणामातेचा जलपूजन सोहळा थाटात पार पडला. जलपूजन ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून गिरणामायला पाच सुवासिनींच्या हस्ते साडी चोळीचा आहेर देऊन ओटी भरण्यात आली.
सकाळी गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत गिरणा नदीच्या पात्रापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गिरणा मायच्या नावाने घोषणा देत परिसर भक्तीच्या निनादाने दणाणला होता. वाडे ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गिरणा धरण भरल्याने वाडे नागरिकांमध्ये आनंदाला उधाण
निसर्गाच्या अवकृपेने गिरणा धरण अनेक वर्षांपासून पाण्याने भरत नव्हते. गिरणा नदीला अनेक वर्षांपासून पुराचे पाणी आले नाही. गिरणा काठी राहणाऱ्यांना दुष्काळासह चटके सहन करावे लागले. मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने चांगली आभाळमाया बरसल्याने गिरणा धरण तब्बल १२ वर्षांनंंतर १०० टक्के भरले. गिरणा नदी यंदा प्रथमच पुराच्या पाण्याने दुथडी भरून वाहिली. यात काही जीवितहानी वा नुकसान झाले नाही. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. या आनंदाने आज गिरणा काठ सुखावला आहे. वाडे येथील नागरिकांमध्येही आनंदाचे उधाण आले आहे.
गिरणामायला साडी चोळीचा आहेर देण्याच्या उपक्रमासाठी उद्यानपंडित राजेंद्र हरी पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रामस्थांच्या मदतीने व लोकवर्गणीतून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमिक विद्यालयातील कलशधारी मुली सहभागी झाल्याने मिरवणुकीत आकर्षण ठरले. यात वारकरी सांप्रदायाचे भाविक, नागरिक, महिला, विद्यालयाच्या मुली आदींंचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
यावेळी स्वाती राजेंद्र पाटील, उषाबाई अशोक परदेशी, मेघा गोपाल परदेशी, सविता हेमराज माळी, साधना मनोज पाटील यांनी सपत्नीक पूजाअर्चा केली. पूजन गोंडगावचे पुजारी उमेश जोशी यांनी केले.