संडे स्पेशल मुलाखत- पतीनंतर रेल्वेने दिला आयुष्याला आधार-पहिल्या महिला कुली इंदूबाई वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:31 AM2020-09-20T00:31:24+5:302020-09-20T00:33:33+5:30

आज महिलेने पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे किंबहुना एक पाऊल पुढेच टाकले आहे.

After her husband, the railways gave her life as a support - the first female porter Indubai Wagh | संडे स्पेशल मुलाखत- पतीनंतर रेल्वेने दिला आयुष्याला आधार-पहिल्या महिला कुली इंदूबाई वाघ

संडे स्पेशल मुलाखत- पतीनंतर रेल्वेने दिला आयुष्याला आधार-पहिल्या महिला कुली इंदूबाई वाघ

Next
ठळक मुद्दे संडे स्पेशल मुलाखतचर्चेतील व्यक्ती थेट संवादकोणतेही काम ‘कमीपणा’चे नाही

वासेफ पटेल
भुसावळ : आज महिलेने पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे किंबहुना एक पाऊल पुढेच टाकले आहे. पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर, वैमानिक असे कोणतेही क्षेत्र असो यात महिला मुळीच मागे नाही. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात महिलेच्या रुपात प्रथम कुली असण्याचा मान इंदूबाई वाघ यांना मिळाला आहे. कोणतेही काम कमीपणाचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पती एकनाथ वाघ यांचे सन १९९९ मध्ये निधन झाले. यानंतर परिवाराची संपूर्ण जबाबदारी इंदूबार्इंवर आली. पतीच्या निधनानंतर त्या वडील पांडुरंग मानकर यांच्याकडे आल्या. कुटुंबात सात बहिणी. वडील एकटे कमावणारे. वडीलही रेल्वेत कुली. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासू शेती करून संसाराचा गाडा ओढला. सात बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली. अशातच वडील विविध आजाराने व्याधीग्रस्त असल्याने त्यांचेही काम होईना. वडिलांच्या जागेवर ‘महिला कुली’ म्हणून संधी मिळाली. १० सप्टेंबर रोजी प्रथम महिला कुली होण्याचा मान मिळाला. तसेच जबाबदारी वाढली. इंदूबार्इंनी बिल्ला क्रमांक ७च्या माध्यमाने इतिहास घडवला आहे.
प्रश्न : महिला असताना कुलीचे कार्य करताना कसे वाटते?
उत्तर : खऱ्या अर्थाने तर सांगायचं म्हटल्यास कोणतेही काम कधी छोटे नसते. महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे, प्रगती करीत आहे. ‘प्रथम महिला कुली’चा मान मिळाला. काम जरी छोटे असले तरी महिला म्हणून कामाला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. काम करताना कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता घेतलेली जबाबदारी पार पाडणे हेच उद्दिष्ट आहे. महिलांनी कधीही स्वत:ला कमजोर व दुय्यम समजू नये.
प्रश्न : महिलांना ठरणार प्रेरणा?
समाजाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर आजपर्यंत महिला पोलीस क्षेत्रात काम करण्यास इच्छुक नव्हत्या किंबहुना श्रमाचे काम महिला करू शकणार नाही, अशी महिलांबाबत सगळ्यांची समजूत होती, मात्र ती साफ चुकीची आहे. पुरुषांच्या मानाने सामाजिक दृष्टिकोनातून महिलांना जरी काही बंधने असली तरी कोणत्याही क्षेत्रात महिला मुळीच मागे नाही. कोणतेही काम महिला सहज हाताळू शकते यात तिळमात्र शंका नाही. मी कुलीचे काम करीत असताना यातून महिलांना नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
प्रश्न : कुली होण्यासाठी कोणी केले सहकार्य?
वडील पांडुरंग मानकर हे अनेक वर्षांपासून कुलीचे काम करत होते. मात्र वयोमानानुसार त्यांना अनेक व्याधींचा त्रास व्हायला लागला. चुलत भाऊदेखील या क्षेत्रात आहे. त्यांनी मला धीर दिला. हिंमत दिली की वडिलांच्या जागेवर तुला रेल्वेमार्फत संधी मिळू शकते. क्षणाचाही विलंब न करता वडिलांना आता आरामाची गरज असून, स्वत: जबाबदारी घेऊ याचा निश्चय केला व कुली होण्यासाठी होकार दिला. रेल्वे प्रशासनाने या प्रक्रियेत सहकार्य केले. १० सप्टेंबर रोजी कुली म्हणून नाशिक रोड येथे नियुक्ती झाली.
प्रश्न : शिक्षण किती महत्वाचे?
नक्कीच शिक्षणाशिवाय जीवन व्यर्थ आहे. शिकण्याची खूप इच्छा असतानासुद्धा परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकले नाही. शिक्षण घेतले असते तर आज नक्कीच उच्च पदावर व संधी मिळाली असती. असो जी संधी मिळाली त्याचे सोने करणे आपल्या हातात आहे. मला एकुलता एक मुलगा असून त्याच्या शिक्षणावर संपूर्ण भर देत आहे. नक्कीच त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. शिक्षणानंतर त्याने ठरवलेले ध्येय पूर्ण करेल, अशी मला अपेक्षा आहे.
प्रश्न : बिल्ला क्रमांक ७ घालून कसे वाटते?
बिल्ला क्रमांक ७ ने इतिहास घडवला. भुसावळ विभागात प्रथम महिला कुली म्हणून माझी वडिलांच्या जागी नियुक्ती झाली. नाशिक रेल्वे स्थानकावर नियुक्ती झाली. पतीच्या निधनानंतर रेल्वेने मला आधार दिलेला आहे. कुलीची नियुक्ती झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे ओझे वाहताना आतापर्यंत पुरुष कुली म्हणून दिसायचे, मात्र आता मलाही बिल्ला क्रमांक ७ मिळाला आहे अर्थातच यामुळे इतिहास घडला आहे. मला आधुनिक व स्पर्धा स्पर्धात्मक युगामध्ये महिलाही पुरुषांपेक्षा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवण्याची संधी मिळाली आहे व ते मी सार्थ करून दाखवणार.

Web Title: After her husband, the railways gave her life as a support - the first female porter Indubai Wagh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.