भाजपाचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी; जळगावनंतर 'मिशन मुक्ताईनगर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:42+5:302021-05-29T13:14:25+5:30

अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय ...

After Jalgaon, Shiv Sena is also preparing to take Muktainagar from BJP | भाजपाचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी; जळगावनंतर 'मिशन मुक्ताईनगर'

भाजपाचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी; जळगावनंतर 'मिशन मुक्ताईनगर'

Next

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने आता जिल्ह्यात आपला पाय घट्ट रोवण्याची तयारी केली असून, जळगाव महापालिकेत सत्ताधारी भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता मुक्ताईनगरात देखील भाजपचे सहा नगरसेवक आपल्या बाजूने घेत भाजपसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना धक्का देत शिवसेनेने नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मार्च महिन्यात जळगाव महापालिकेतही शिवसेनेने भाजपच्या हातून सत्ता आपल्याकडे खेचून घेतली. याठिकाणी ५७ नगरसेवकांसह भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. मात्र, १५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावत महापौर पदावर आपला उमेदवार विराजमान केला. जळगावनंतर आता मुक्ताईनगरातही अशाच हालचाली सुरू आहेत. भाजपच्या नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवत याठिकाणी सत्तांतर घडवण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने मुक्ताईनगरात भाजपचे सहा नगरसेवक फोडून सत्तेच्या दिशेने कूच केली आहे. तसेच येणाऱ्या दोन दिवसांत शिवसेनेने अजून काही नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे.

खडसेंच्या गडात पाय रोवतेय शिवसेना

विशेष म्हणजे, भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांचा गड असलेल्या मुक्ताईनगरात शिवसेना हा सत्तांतराचा प्रयोग करत आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांच्यात राजकीय हाडवैर आहे. आतापर्यंत ते एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकाच झेंड्याखाली असले तरी त्यांच्यातील वितुष्ट मात्र कायम असल्याची प्रचिती येते. आता पुढे काय घडते, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची युती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोडली होती. ही गोष्ट शिवसैनिकांच्या मनात अजूनही कायम आहे. त्यामुळे शिवसेनेने मुक्ताईनगरमध्ये भाजपसह माजी मंत्री एकनाथ खडसे यांनादेखील एक प्रकारे आव्हान दिले आहे.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी

ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी आता शिवसेनेने आपली ताकद वाढवण्याचा दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक न लढता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवून शहरात कमी होत असलेल्या संघटनेला बळ देण्याचे काम केले. महापालिकेच्या निवडणुकीत जरी शिवसेनेचा पराभव झाला, तरी अडीच वर्षांतच शिवसेनेने पुन्हा महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे. हाच कित्ता आता मुक्ताईनगरात देखील गिरवत शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्हा बँक, बाजार समिती, दूध संघ या सहकारी संस्थांच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला जास्त महत्त्व न देता भाजपने आपली ताकद वाढवली होती. मात्र, यावेळेस शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सहकारी संस्थांच्या माध्यमातून संघटन वाढवण्याची तयारी देखील शिवसेनेने केलेली दिसून येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहसंपर्कप्रमुख विलास पारकर यांनीदेखील शिवसेनेचे संघटन वाढवण्यासह आक्रमक पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचे ऑपरेशन शिवधनुष्य हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

Web Title: After Jalgaon, Shiv Sena is also preparing to take Muktainagar from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.