खरीपनंतर आता रब्बीचा हंगामही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:48 AM2021-01-08T04:48:57+5:302021-01-08T04:48:57+5:30
जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...
जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असून, बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील नुकसानभरपाई देखील अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नसताना आता रब्बीचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. खरिपातील नुकसानभरपाई रब्बीत भरून काढण्याची आशा देखील अवकाळी पावसाने फोल ठरविल्या आहेत.
यंदा हवामान बदल परिणामाचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणात बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप तर आता अवकाळीमुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत जात आहेत. रब्बीची लागवड झाल्यानंतर डिसेंबर महिन्यातच अवकाळीने हजेरी लावली; मात्र तेव्हा फारसा फटका रब्बीच्या पिकांना बसला नव्हता; मात्र पिकांची चांगली वाढ झाली असून, त्यात दाणे तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असतानाच पाऊस झाल्याने पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
हरभऱ्याचा खार धुतला गेला, गव्हाची वाढही थांबणार
बुधवारी झालेल्या पावसामुळे हरभऱ्याचा खार धुतला गेला आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दाणे लागण्याच्या प्रक्रियेला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असून, दाणे लहान व बारीकच राहण्याची शक्यता आहे. तर थंडीच गायब असल्याने गव्हाचीही वाढ खुंटली आहे. दादर व मक्याला देखील पावसाचा फटका बसला असून, जळगाव तालुक्यातील गिरणा व तापी पट्ट्यात रात्री पावसासोबतच हवेचा जोर देखील जास्त असल्याने दादर आडवी पडली आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे मक्यावर अळीचा प्रादुर्भाव पडण्याची शक्यता आहे.
काय आहे पावसाचे कारण
जम्मू-काश्मीर व त्याला लागून असलेल्या हिमाचल प्रदेश भागात पश्चिमी विक्षोभ तयार झाला आहे. हा विक्षोभ आता राजस्थानकडे सरकला आहे. त्यातच अरबी व बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे राजस्थानजवळ तयार झालेल्या विक्षोभाजवळच एकमेकांना आदळत आहेत. यामुळे महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, अजून ११ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून, किमान तापमान देखील १८ ते २० अंशादरम्यान राहण्याची शक्यता आहे.