कोरोनामुक्तीनंतर खान्देशातील कलावंतांनी शोधले नवे आकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:53+5:302020-12-12T04:32:53+5:30

कोरोनाच्या या प्रादुर्भावात संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. समाजातील सर्व घटकांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. ...

After the liberation of Koronam, artists from Khandesh discovered a new sky | कोरोनामुक्तीनंतर खान्देशातील कलावंतांनी शोधले नवे आकाश

कोरोनामुक्तीनंतर खान्देशातील कलावंतांनी शोधले नवे आकाश

Next

कोरोनाच्या या प्रादुर्भावात संपूर्ण जग हवालदिल झाले आहे. समाजातील सर्व घटकांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. या स्थितीत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्यकला व त्याचबरोबर पारंपरिक लोककलेतील तमाशा, शाहिरी, वहीगायन, लोककला पथके आदी लोककला क्षेत्रातील कलावंतांना या कोरोनाच्या महामारीत कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला.या आपत्तीच्या काळात सर्वात जास्त झळ बसली आहे ती सांस्कृतिक क्षेत्राला. मात्र जळगावातील नाट्य कलावंत व लोककलावंतांनी यावर मात करीत आता नवे आकाश धुंडाळण्यास सुरुवात केली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक चळवळीला एक मोठा इतिहास आहे. संगीत-नृत्य-नाट्य या तिन्ही कलाप्रकारांतील परंपरांची जपवणूक करीत वाटचाल सुरू होती. कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे थंडावलेली ही चळवळ आता कोरोनाकाळातील नियमांशी बांधील राहून एक नवे अवकाश शोधत आहे.

मुळात नाट्य मग ते लोकनाट्य असो, की नाटक. ही समूहाने करण्याची कला आहे. समोर प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर नाट्यकलावंतांचा उत्साह वाढत असतो व त्यानंतर प्रयोग रंगत जात असतो. आज खान्देशात २० तमाशा फड, ६ - ७ शाहिरी पथके, सोंगाड्या पार्ट्या, वही गायनाची पथक, गोंधळाची पथके आहेत. या लोककलांच्या माध्यमातून ७ ते ८ हजार लोककलावंत विविध ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोनाकाळात कार्यक्रम बंद झाल्याने या कलेवर अवलंबून असणाऱ्या लोककलावंतांच्या उदरभरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता.

मात्र लोककलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच जनजागृती करण्याचा वसा घेतलेल्या या लोककलावंतांनी हार मानली नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाविषयक जनजागृती करण्यास सुरुवात केली. आता लॉकडाऊन संपल्यानंतर या कोरोनामुक्तीच्या काळातदेखील त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

तसेच जळगाव शहर व जिल्ह्यात जवळपास २०-२५ हौशी नाट्यसंस्था कार्यरत आहेत. त्यांनीदेखील वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपले कार्य सुरू ठेवले आहे. कोरोनाच्या नियमांमुळे सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रेक्षकसंख्या मर्यादित झाली असल्याने, खुल्या रंगमंचाचा वापर करून विद्या इंग्लिश मीडिअम व परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून एक खुला रंगमंच जळगावकर कलावंतांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रंगमंचावर जळगावातील रंगकर्मी हर्षल पाटील यांच्या ‘नली’ या शंभू पाटील नाट्यरूपांतरित व योगेश पाटील दिग्दर्शित एकल नाट्याचा प्रयोग होऊन या रंगमंचाची सुरुवात करण्यात आली. हर्षल पाटील यांनी लॉकडाऊनमध्ये अभिनय कल्याण येथे दोन प्रयोग तर नाशिक येथील गच्चीवरील रंगमंचावर एक असे नली या एकल नाट्याचे प्रयोग केले. विद्या इंग्लिश मीडियमच्या रंगमंचावर इतरही कलावंतांनी आपली कला सादर करावी, असे आवाहनही या दोन्ही संस्थांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पहिल्या लॉकडाऊनपासूनच जळगावातील स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानच्या दीपक चांदोरकर यांनी कलावंतांना ऑनलाइन सादरीकरणाची संधी दिली होती. चांदोरकर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिकसह बृहन्महाराष्ट्रातील कलावंतांनी आपले सादरीकरण केले. तसेच भुसावळ येथील उत्कर्ष कलाविष्कार या संस्थेच्या माध्यमातून अनिल कोष्टी यांनी खान्देशातील विविध क्षेत्रातील कलावंतांना एकत्र आणत व्हिडिओच्या माध्यमातून काव्यवाचन, अभिवाचनसारखे वेगळे प्रयोग केले. या दोघांच्या या उपक्रमाला कोरोनामुक्तीत नवा आयाम देत ऑनलाइन पाडवा पहाटच्या माध्यमातूनही परिवर्तनने एक नवे पाऊल उचलले आहे.

व्यावसायिक बंधूंनी उचलले एक वेगळे पाऊल

जळगावातील सांस्कृतिक चळवळीला साउण्ड सिस्टीम व लाइट पुरविणाऱ्या चिरमाडे साउण्ड सर्व्हिसेसचे संचालक महेश आणि मनीष चिरमाडे या बंधूंनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत साउण्ड सिस्टीम व लाइटसह मर्यादित प्रेक्षकसंख्येचा रंगमंच उपलब्ध करून दिला असून, या ठिकाणी रेसिपी शो, अभिवाचन, गायन, पाडवा पहाट या प्रकारातील प्रयोगांचे आगळेवेगळे आयोजनही करण्यात आले आहे. या सर्व प्रयोगांचे चिरमाडे साउण्डच्या फेसबुक पेजवर लाइव्ह प्रक्षेपण करून त्यांनी या चळवळीला बळ देत एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.

खान्देशस्तरीय लोककलावंत विचार परिषद

कोरोनाच्या आपत्तीमुळे लोककलावंतांवर मोठ्या प्रमाणात अरिष्ट आलेले आहे. त्यांच्यासाठी हा अतिशय कठीण असा कालखंड आहे. या अनुषंगाने कलावंतांच्या विविध समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आणि काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद व अ.भा.तमाशा परिषदेच्या माध्यमातून खान्देशस्तरीय लोककलावंत विचार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत शासकीय स्तरावरून कलावंतांना मदत मिळावी, जळगावात लोककला भवन तर अमळनेरात तमाशा भवन उभारण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

एवढे सगळे असूनही एकूणच खान्देशातील रंगभूमी ही लोककला आणि हौशी नाटकांची रंगभूमी आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कलावंतांच्या नोकऱ्या गेल्या असून, आर्थिक नियोजनही कोलमडले आहे. हातावर पोट असणाऱ्या या कलावंतांना आश्वासनांव्यतिरिक्त फार काही मदत मिळालेलीही नाही. जळगावातील काही रंगकर्मींनी वैयक्तिक स्वरूपांत इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केला. तरीही सद्यपरिस्थितीत ज्यांची स्थिर नोकरी आहे, त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात केली आहे.

प्रेक्षकांची उदासीनता

सांस्कृतिक कार्यक्रमाला मूळ अधिष्ठान असते ते रसिकांचे. रसिकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम रंगतो. जळगावकर कलावंतांनी लाइव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या मनोरंजनाच्या मेजवानीला जसा प्रतिसाद लाभला तसा अद्याप खुल्या रंगमंचावरील प्रयोगांना लाभत नसल्याची खंत कलावंतांकडून व्यक्त होत आहे. जर आपण खरेदीसाठी मॉलमध्ये फिरत असू, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेऊन सहलीला जात असू तर नाट्यप्रयोगाला जाण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत जळगावकर कलावंत त्यांच्या नव्या उपक्रमांना प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा म्हणून साद घालत आहेत.

कोरोनाच्या या कठीण परिस्थितीतही कला सादरीकरणाचे नवनवीन पर्याय शोधत, आपली कला जिवंत ठेवण्याचा जळगावातील कलावंतांनी केलेला प्रयत्न अभिमानास्पद आहे.

विनोद ढगे

रंगकर्मी/लोककलावंत

जळगाव

मो.नं. ९४२२७८२२४७

Web Title: After the liberation of Koronam, artists from Khandesh discovered a new sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.