कीर्तन ऐकून गावात थांबलेल्या वृद्धाने रेल्वेखाली दिले झोकून
By विजय.सैतवाल | Published: April 15, 2024 10:14 PM2024-04-15T22:14:30+5:302024-04-15T23:39:34+5:30
शिरसोली ते दापोरा दरम्यान आत्महत्या : मुलाला एकटेच घरी पाठवले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रात्री गावात कीर्तनासाठी गेलेल्या मधूकर बाबूराव पाटील (७२, रा. शिरसोली प्र.न. ह. मु. जळगाव) यांनी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरा दरम्यान असलेल्या दोन पुलाजवळ उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळचे शिरसोली येथील मधूकर पाटील हे सेट्रींग काम करायचे. ते वर्षभरापूर्वी जळगाव येथे मुलासह राहायला आले. शिरसोली येथे सप्ताह असल्याने मुलासह ते कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. कीर्तन संपल्यानंतर ते मुलासोबत घरी न जाता त्यांनी गावात राहत असलेल्या त्यांच्या साडूभाऊकडे राहतो असे सांगितले. त्यामुळे त्यांचा मुलगा हा एकटाच घरी निघून गेला.
सोमवारी सकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी शिरसोली ते दापोरा दरम्यान मधूकर पाटील यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. रेल्वे ट्रॅकमन राकेश महतो यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला.
शोध घेत असताना दिसला मृतदेह
सकाळच्या सुमारास मधुकर पाटील हे घरातून निघून गेल्यामुळे त्यांचा गावात शोध घेतला जात होता. यावेळी त्यांच्या साडूच्या मुलाला शिरसोली ते दापोरा दरम्यान अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्याने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मुरलीधर पाटील हे मृतावस्थेत आढळले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.