महापौरानंतर उपमहापौरांनीही वॉटरग्रेसबाबत उपस्थित केली शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:14 AM2020-12-29T04:14:17+5:302020-12-29T04:14:17+5:30
आयुक्तांकडून माहिती मागवली : चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचा सूचना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचे काम ...
आयुक्तांकडून माहिती मागवली : चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचा सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचे काम करत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटींगला उपठेका दिल्याचा चर्चा सुरु आहेत. याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी मनपाकडे वॉटरग्रेसची चौकशी करून, दोषी आढळल्यास मक्ता रद्द करण्याचा सूचना दिल्या होत्या. आता महापौरानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी देखील मनपा आयुक्तांकडे वॉटरग्रेसबाबत येणाऱ्या तक्रारींची माहिती घेवून चौकशी करण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत.
उपमहापौर सुनील खडके यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठविले. या पत्रात म्हटले आहे की, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत कोळी यांनी पाहणी केल्यानंतर वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी माती वाहनांमध्ये भरत असल्याचे आढळून आले होते. तसेच मक्तेदाराकडून शहरातील स्वच्छतेचे काम समाधानकारक नसल्याच्या तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. यासह वॉटरग्रेस कंपनीने उपठेका दिल्याचाही चर्चा असून, याबाबत चौकशी करण्याचाही सूचना उपमहापौरांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत.