राष्ट्रवादीच्या सभेनंतर हुल्लडबाजी
By admin | Published: February 14, 2017 01:13 AM2017-02-14T01:13:09+5:302017-02-14T01:13:09+5:30
पाळधी येथील घटना : उमेदवाराची पोलीस अधीक्षकांकडे दगडफेकीची तक्रार
पाळधी / जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित सभेनंतर काही कार्यकत्र्यानी हुल्लडबाजी केल्याची घटना पाळधी ता. धरणगाव येथे सोमवारी रात्री 10 वाजता घडली. तर शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी दगडफेक केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यानी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
गांधी चौकात राष्ट्रवादीतर्फे रात्री 8.30 वाजता जाहीर सभा घेण्यात आली. यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, विलास पाटील तसेच उमेदवार रमेश माणिक पाटील यांची भाषणे झाली. रमेश पाटील यांनी भाषणात प्रताप पाटील यांना उमेदवारी द्यायची असल्याने आपली उमेदवारी कापण्यात आल्याचा उल्लेख करीत गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. सभा आटोपल्यानंतर या वाक्याबद्दल पाळधीतील काही तरुणांनी रमेश पाटील यांना जाब विचारला व त्यांच्या वाहनाभोवती हुल्लडबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत जमलेल्या युवकांना पांगविले.
दरम्यान, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या समर्थकांवर कारवाई करावी यासाठी 50 ते 60 जण रात्री साडेअकरा वाजता जळगावात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.तेथे रमेश पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, सभा आटोपल्यानंतर ते कारने घराकडे जात असताना जमावाने शिवीगाळ करुन कारवर हल्ला केला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती पाहता पोलिसांनी मला तेथून हलविले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
4या हल्ल्यानंतर रमेश पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना घटनेची माहिती दिली. देवकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाळधीत तक्रार करण्याचे सांगितले, मात्र स्थानिक पोलीस मंत्र्यांच्या दबावात असल्याचा आरोप करुन पाटील यांनी तेथे तक्रार न करता थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प.सदस्य रवींद्र भिला पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, दोनगावचे माजी सरपंच अशोक शिंदे, किशोर पाटील, डी.एस.पाटील, शिवाजी पाटील, नीलेश पाटील, आनंदा पाटील, पं.स.चे उमेदवार किरण नन्नवरे यांच्यासह अनेक जण पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते.
4मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सभेनंतर दगडफेक झालेली नाही. गावात आतार्पयत अनेक सभा झाल्या आहेत. कधीच असे प्रकार घडले नाही आणि घडणार नाहीत. कारण गावातील लोक सूज्ञ आहेत. आपण नेहमी मतांच्या आशीर्वादावर निवडून येतो, भानगडीवर नाही.
- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री, जळगाव.
पाळधीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस लक्ष ठेवून होते. बाकी काही घडले असेल तर ते राजकीय आहे.
- विजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, पाळधी.