नराधम पतीनंतर आता वाल्मीक नगरातून मित्राच्याही मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 03:21 PM2020-09-22T15:21:39+5:302020-09-22T15:21:56+5:30
रामानंदनगर पोलिसांची कारवाई : न्यायालयात हजर करणार
जळगाव : . स्वत:च्या फायद्यासाठी एका विकृत पतीने अक्षरश: पत्नीला जखडून ठेवले आणि सोबत असलेल्या मित्राला अत्याचारात मदत केली. नंतर स्वत:सुध्दा पत्नीवर अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या प्रकरणात रविवारी पतीच्या मुसक्या आवळल्यानंतर मंगळवारी रामानंदनगर पोलिसांनी त्याच्या अत्याचारी मित्राला सुध्दा वाल्मीक नगरातून अटक केली आहे. रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा-हुडको) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शनिवारी समोर आली होती. धुळे येथील माहेरवासीनी असलेल्या महिलेचा वाल्मिक नगरातील एका छोट्या व्यावसायकाशी विवाह झाला होता. लॉकडाउनमुळे महिलेच्या पतीचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे पतीने मित्रासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. परंतु, राहत असलेल्या भागात भाजीपाला विक्री करण्याची लाज वाटत असल्यामुळे पतीने मित्राच्या भाड़याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणी मित्र रमेश हा एकटाच राहत होता. नंतर त्या भाड्याच्या घरात दोघं पती पत्नी आले. ८ जून रोजी रात्री जेवणानंतर पतीने पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे सांगितले, यावरून दोघांमध्ये वाद झाला. अखेर रात्री पती बाहेरून परतल्यानंतर त्याने पत्नीला कोल्ड्रींग्स आणून तिला पाजले. अर्धातासानंतर तिला चक्कर आल्यानंतर पत्नी व त्याच्या मित्राने महिलेला बाथरूममध्ये नेले. नंतर पत्नीला पतीने पकडून ठेवल्यानंतर मित्र रमेश याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पतीने सुध्दा पत्नीवर अत्याचार केला होता. हा प्रकार माहेरच्यांना सांगितल्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात पती व त्यांच्या मित्राविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी फरार पती हा पुण्याकडून जळगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अखेर बसमधून उतरत असताना सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. नंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
इंदौरहून येताच, वाल्मीक नगरातून केली अटक
नराधम पतीचा मित्र रमेश काकडे हा इंदोर येथे बहिणीकडे असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांना मिळाली होती. त्यातच तो वाल्मीकनगरात आला असल्याची माहितीही त्यांना मिळाली. मंगळवारी दुपारी एक वाजता पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रूपेश ठाकूर आदींनी वाल्मीकनगरात सापळा रचून रमेश काकडे याला अटक केली. दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून पीडित महिलेचा पती व रमेश काकडे हे मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बुधवारी काकडे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.