शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णयानंतर अनिल पाटील सोडणार आमदारकीवर पाणी
By Ajay.patil | Published: May 2, 2023 05:17 PM2023-05-02T17:17:13+5:302023-05-02T17:17:51+5:30
या निर्णयानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
जळगाव -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी 'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याशिवाय पुर्ण होवूच शकत नाही. जर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला नाही, तर मी माझा आमदारकीचा राजीनामा पक्षाध्यक्षाकडे देणार असल्याची भूमिका आमदार अनिल पाटील यांनी घेतली आहे. आपण सायंकाळपर्यंत राजीनामा पाठविणार असल्याची माहितीही पाटील यांनी ‘लोकमत’ ला दिली.
शरद पवार यांनी सर्वसामान्य जनतेसह पक्षातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करुन आपला निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी अनिल पाटील यांनी केली. तसेच जर ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत, तर आमदारकीचा राजीनामा आम्ही देणार आहोत. माझ्यासह पक्षातील इतर आमदार देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील असेही अनिल पाटील म्हणाले.