१० दिवसांच्या विश्रांतीनंतर बिबट्या पुन्हा जागा, वासराचा पाडला फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:05+5:302021-07-17T04:14:05+5:30
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : वरखेडे, ता. चाळीसगाव येथील शिवारात आठ ते १० दिवसांपासून शांत असलेल्या बिबट्याचा पुन्हा उपद्रव ...
मेहुणबारे, ता. चाळीसगाव : वरखेडे, ता. चाळीसगाव येथील शिवारात आठ ते १० दिवसांपासून शांत असलेल्या बिबट्याचा पुन्हा उपद्रव वाढला आहे. पिंपळवाड म्हाळसा-उंबरखेडे रस्त्यालगत एका शेतातील वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उंबरखेड-पिंपळवाड म्हाळसा रस्त्यावरील अशोक पाटील शेतात गेले असता शेतातील वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती तत्काळ वनविभागाला दिली. वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक संजय चव्हाण, श्रीराम राजपूत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
बिबट्याचे ग्रामस्थाला दर्शन
गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली थंडावल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी सुस्कारा सोडला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी पिंपळवाड म्हाळसा रस्त्यालगत वरखेडे खुर्द येथील प्रकाश सखाराम महाजन यांच्या शेताजवळ एका ग्रामस्थाला बिबट्याचे दर्शन झाले. भीतीने थरकाप उडालेल्या या ग्रामस्थाने गावात धूम ठोकली, तर दोन दिवसांपूर्वी पिंपळवाड येथील दोन पाळीव कुत्र्यांचाही फडशा बिबट्याने पाडल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरखेडे शिवारात बिबट्याने पशुधनावर हल्ल्याचे सत्र चालवले होते. त्यानंतर बिबट्याच्या कारवाया थंडावल्या होत्या. मात्र, आठ-दहा दिवसांनंतर पुन्हा बिबट्या जागा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.