युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा
By सागर दुबे | Published: March 2, 2023 08:31 PM2023-03-02T20:31:06+5:302023-03-02T20:31:56+5:30
डीवायएसपींच्या पथकाची कारवाई ; १ लाख ६८ हजारांच्या बनावट नोटा जप्त
जळगाव : हमाली काम करता-करता युट्यबवरील व्हिडिओ पाहून प्रिंटरच्या माध्यमातून घरामध्ये चक्क बनावट नोटा तयार करणाऱ्या कुसूंबा येथील देविदास पुंडलिक आढाव (३१) या तरूणाचा उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रूपयांच्या बनावट नोटा तसेच प्रिंटर, नोटा बनविण्यासाठी लागणारे कागद असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नकली नोटा चलनात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बनावट नोटा बनविणा-या काही लोकांना पकडले होते. त्यानंतर बुधवारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांना माहिती मिळाली की, एमआयडीसीतील व्ही सेक्टर भागात कुसूंबा येथील देविदास आढाव हा तरूण बनावट नोटा तयार करून त्या नोटा बाजारात विक्री करण्यासाठी वापर करत आहे. गावीत यांनी लागलीच पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, राहुल बैसाने, महेश महाले, रवींद्र मोतीराया, नीलेश पाटील, सुहास पाटील, रेवानंद साळूंखे, चंद्रकांत पाटील, विजय जाधव यांचे विशेष पथक तयार करून कारवाईच्या सूचना केल्या.
पंटर पाठवून केली खात्री, ओक्के मिळताच रचला सापळा...
आढाव याला जाळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी प्लॅन आखला. त्यांनी खासगी पंटरला आढाव याच्याकडे पाठवून बनावट नोटा कमी दरामध्ये देण्यास सांगितले. त्यामुळे आढाव व पंटरमध्ये बनावट देण्याचा हिशोब ठरला आणि भेटण्याचे स्थळही ठरले. दरम्यान, आढाव हा बनावट नोटा देत असल्याची खात्री झाल्यावर ही माहिती पंटरने पथकाला दिल्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर आढाव हा एमएच.१९.डीयू.१२०३ क्रमांकाच्या दुचाकीवरून आला. त्याने पंटरच्या हातात बनावट नोटांची पिशवी देवून ख-या नोटा घेतल्या. पोलिसांनी लागलीच आढावा याला पकडून चौकशी केली.