सात तासांनी वाघूरचा वीज पुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:30+5:302021-03-22T04:14:30+5:30
महावितरण : कडगाव येथे १३ विद्युत खांब कोसळले जळगाव : शनिवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शहराला ...
महावितरण : कडगाव येथे १३ विद्युत खांब कोसळले
जळगाव : शनिवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूरचा पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठाही खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्रीच हे काम हाती घेऊन तब्बल सात तासांनी हा वीज पुरवठा सुरळीत सुरू केल्याचे महावितरणच्या शहर कार्यालयाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी सांगितले. तर कडगाव येथे वाऱ्यामुळे सात विद्युत खांब कोसळले असून, रविवारी दुपारपर्यंतही हा वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी अचानक झालेल्या या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. वाऱ्यामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र, वाघूर पंपिंग स्टेशनवरील वीज पुरवठा करणाऱ्या सब स्टेशनच्या परिसरात अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे बिघाड शोधण्याचे रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. जळगाव शहराचा पाणी पुरवठाही या वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून, रात्री एक वाजता वीज पुरवठा सुरळीत केला.
इन्फो :
कडगाव येथे रात्रभर वीज पुरवठा खंडित
तालुक्यातील कडगाव येथे शनिवारी झालेल्या पावसामुळे तेथील सब स्टेशनच्या परिसरात १३ ठिकाणी विद्युत खांब कोसळले. तसेच अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडांच्या फांद्याही कोसळल्या. यामुळे कडगाव येथे रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. रात्रीच्या वेळी काम करणे शक्य नसल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा काम हाती घेतले. मोठ्या प्रमाणावर खांब कोसळून तांत्रिक बिघाड झाला असल्याने, रविवारी दुपारपर्यंतही कडगाव येथील वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. युद्ध पातळीवर बिघाड शोधण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.