जळगाव जिल्हा रुग्णालयात तब्बल सहा वर्षानंतर सीटीस्कॅन सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:26 PM2017-10-14T12:26:14+5:302017-10-14T12:31:30+5:30
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 14 - तब्बल सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात सीटीस्कॅन सुविधेचा शुभारंभ शुक्रवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. वर्षभरात एमआरआयची देखील सुविधा उपलब्ध करून दिली जाईल व या ठिकाणी राज्यभरातील डॉक्टर आणण्यात येऊन रुग्णालयाचा कायापालट करणार असल्याची ग्वाही महाजन यांनी दिली.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अधिष्ठाता डॉ. बी. एस. खैरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन.एस. चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा नसल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत होते. मात्र आता गैरसोय दूर होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने येथे राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून येथे कोणतीच कमी राहणार नाही. वर्षभरात एमआरआयची सुविधा देखील सुरू करणार असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे मात्र राजकीय, सामाजिक कार्यकत्र्यानी या ठिकाणी डॉक्टरांसोबत वाद घालून किरकोळ कारणांसाठी सिटीस्कॅनचा आग्रह धरू नये तसेच राजकीय नेत्यांनी सुद्धा यात हस्तक्षेप करू नये, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले.
जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील येणार असल्याने जिल्हा रुग्णालय चकाचक केले होते.
मार्च-एप्रिलमध्ये प्रवेश प्रक्रिया
जिल्हा रुग्णालयापासून सुरुवात झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस मार्च-एप्रिल महिन्यात सुरुवात करणार असल्याचे महाजन यांनी यावेळी सांगितले.