एकमेकांविरुद्ध गळा काढल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:19 AM2021-08-14T04:19:47+5:302021-08-14T04:19:47+5:30
राजकारणात कोणी कुणाचा सदा सर्वकाळ मित्र अथवा शत्रू नसतो, हे अगदी खरे आहे. आमच्या जवळ सीडी आहे तुमचे वस्त्रहरण ...
राजकारणात कोणी कुणाचा सदा सर्वकाळ मित्र अथवा शत्रू नसतो, हे अगदी खरे आहे. आमच्या जवळ सीडी आहे तुमचे वस्त्रहरण करू, अशी वल्गना करणारे जामनेरातील बडे पदाधिकारी कालांतराने एकमेकांच्या गळ्यात गळा घालताना अनेकांनी पहिले आहेत. ज्यांचे हात धरून पक्ष बदल केला, विधानसभा निवडणुकीत तडाखेबंद भाषणे दिली त्यांनी माझ्याजवळ सीडी असल्याचे सांगत काही काळ खळबळ उडवून दिली होती, यानिमित्ताने काही दिवस ते चर्चेत आणि माध्यमांद्वारेही प्रकाशात आले. काही दिवसांपूर्वी बीएचआर घोटाळा उघडकीस आला. अनेकांचे धाबे दणाणले. काही जण सैरवैर पळत सुटले. कुणी पसार तर कुणी राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. यात बडा पदाधिकारी बीएचआर घोटाळ्यानंतर श्रेष्ठींकडे गेल्याची चर्चा होती. सोबत तडाखेबाज भाषण करणारेही होते. एकामेकांवर तोंडसुख घेणारे वाढदिवसाला एकमेकांना केक भरविताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसले आणि तुझ्या गळा... माझ्या गळा...असे म्हणण्याची वेळ आली आहे. खरे तर आता सामान्य नागरिकसुद्धा या राजकारण्यांचे खरे चेहरे ओळखून आहेत. कुणी त्यांचे बोलणे गांभीर्याने घेत नाही. ही मंडळी आता केवळ आणि केवळ इंटरटेन्टमेंट पुरतीच राहिली असल्याचे नागरिकांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची भाषणे अथवा पत्रकार परिषदेतील वक्तव्ये ऐकायची आणि मनोरंजन झाल्यावर सोडून द्यायची, असे आता जनतेनेही ठरवायला हरकत नाही.
- चुडामण बोरसे