प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनंतर खडसे पोहचले फडणवीसांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:57 AM2020-01-04T11:57:08+5:302020-01-04T11:58:02+5:30
नाराजीबद्दल मात्र मौन कायम
जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे आपले विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप करणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी सकाळी जळगाव येथे आलेले फडणवीस यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भेट घेतली. या वेळी खडसे यांनी त्यांच्या नाराजी बद्दल बोलणे टाळल्याने अद्यापही त्यांची नाराजी कायम असल्याचे संकेत मिळत आहे. दुसरीकडे फडणवीस यांच्यावर थेट आरोप झाल्याने त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळत हेलिकॅप्टरमध्ये बसून ते नंदुरबार जिल्ह्यातील धडगावकडे रवाना झाले.
जि.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे-नंदुरबार येथील सभांना जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शुक्रवारी पहाटे जळगावात जैन हिल्स येथे आगमन झाले. त्यावेळी जळगाव जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून खडसेंनी त्यांची भेट घेतली.
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू असताना व या पदांचे नावे प्रदेशाध्यक्षकांकडे पाठविलेले असताना फडणवीस हे जळगावात आले तरी त्यांच्या भेटीसाठी एकनाथराव खडसे हे आलेले नव्हते. त्यामुळे खडसे यांनीच आरोप केलेल्या फडणवीस यांच्या भेटीला ते येता की नाही, या बाबत चर्चा सुरू होती. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाच्या चर्चेसाठी तुम्ही फडणवीस यांची भेट घ्या, अशा सूचना खडसे यांना केल्या व त्यानंतर खडसे हे फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहचले.
खडसेंचे नाराजीबद्दल मौन
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खडसे व महाजन यांनी या वेळी केवळ जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. खडसे यांनी नाराजी कायम आहे का, या बद्दल बोलणे टाळत मौन बाळगले. त्यामुळे त्यांची अद्यापही नाराजी कायम असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.