शस्त्रक्रियेनंतर मल्ल पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:09 PM2018-11-25T13:09:39+5:302018-11-25T13:10:21+5:30
दृढ आत्मविश्वासाने गाजवित आहे मैदान
जळगाव : गुडघ्याच्या दुखापतीमुळे (लिगामेंट इन्जुरी) कुस्तीपासून दूर गेलेला पंजाबमधील नामांकीत मल्ल अब्दुल गणी हा जळगावात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरला असून बुधवार, २८ रोजी जळगावात होणाºया कुस्ती स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे अब्दुल गणीवर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला होता, मात्र जळगावातील शस्त्रक्रियेने गणीला आवडीच्या क्षेत्रात आपले स्थान कायम राखण्याची संधी मिळाली.
पंजाबमधील रहिवासी अब्दुल गणी हा मल्ल आज देशातील द्वितीय क्रमांकाचा मल्ल आहे. मात्र मध्यंतरी पायातील तीन लिगामेंट तुटल्याने (गुडघ्याची दुखापत) तो कुस्ती खेळू शकणार नसल्याचे त्याला सांगण्यात आले होते. देशात अनेक ठिकाणी तो उपचारासाठी गेला मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर जळगावात यावर उपचार होत असल्याची माहिती त्याला मिळाली व त्याने थेट जळगाव गाठले. येथे त्याच्यावर डॉ. मनिष चौधरी यांनी उपचार केले व सर्व निदान झाल्यानंतर गणीवर शस्त्रक्रिया केली आणि हा हिंद केसरी पुन्हा मैदान गाजवू लागला आहे.
दोन वर्षांपासून होता आखाड्यापासून लांब
कुस्तीची प्रचंड आवड असलेला अब्दुल गणी याने देशात अनेक ठिकाणी मैदान गाजविले आहे. मात्र २०१६मध्ये गणीचे तीन लिगामेंट तुटले आणि कुस्तीचा महत्त्वाचा भाग असलेला गुडघाच काम करीत नसल्याने कुस्ती कशी खेळणार असा प्रश्न उभा राहिला. या दुखापतीमुळे गणी कुस्तीच्या आखाड्यापासून लांब गेला. मात्र त्याने हिंमत हारली नाही. उपचाराच्या बाबतीत अनेक ठिकाणी निराशा पदरी पडल्यानंतर जळगावात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर गणी पुन्हा मैदानात उतरला. सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झाली असली तरी तो पुन्हा खेळू शकतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे होते. त्यात शस्त्रक्रियेनंतर पाचच महिन्यात तो पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात उतरला.
जळगावातील स्पर्धेत होणार सहभागी
श्रीराम मंदिर संस्थान रथोत्सव समिती आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने शहरात २८ रोजी होणाºया कुस्त्यांच्या स्पर्धेत अब्दुल गणी सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी आपण येत असल्याची माहिती गणी याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या पूर्वीही अनिल श्रीराम निंबोळकार या कबड्डी खेळाडूवर जळगावात उपचार झाल्याने त्याने थेट कबड्डी प्रो लिगमध्ये धडक मारली होती.
लिगामेंट इंजुरीमुळे अनेक खेळाडू मैदानापासून लांब जातात. मात्र योग्य उपचार व शस्त्रक्रियेमुळे ते पुन्हा खेळू शकतात. अब्दुल गणीवरदेखील अशाच प्रकारे योग्य शस्त्रक्रिया झाल्याने तो पुन्हा मैदानात उतरला आहे.
- डॉ. मनिष चौधरी.
माझ्या लिगामेंट इंजुरीवर जळगावात यशस्वी उपचार झाले. आता मी जळगावात होणाºया कुस्ती स्पर्धेसाठी येत आहे.
- अब्दुल गणी, मल्ल.