महादेव माळला तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नीला घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:52 PM2017-11-02T17:52:56+5:302017-11-02T17:57:45+5:30
नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने मृतदेहाचे जामनेर येथे केले शवविच्छेदन
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.२ : तालुक्यातील महादेव माळ येथील रहिवासी रमेश कनीराम राठोड (वय ३५) यांचा बुधवारी सायंकाळी भुसावळ-जामेनर रस्त्यावरील महाराष्ट्र ढाब्याजवळ संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मयताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
मयत रमेश राठोड यांचे शालक साईराम भिला जाधव मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जात असताना त्यांना तो आढळून आला. त्याने तो मृतदेह उचलून महादेव माळ येथे आणला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयताचे नातेवाईक रात्री महादेव माळ येथे पोहोचले. त्यांनी रमेश राठोड यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत भुसावळ पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सचिन खमगड हे सहकाºयांसह महादेव माळ येथे दाखल झाले. नातेवाईकांच्या मागणीनुसार जामनेर येथे शवविच्छेदन करण्यात आले. साईराम जाधव यांच्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मयत रमेश राठोड यांच्या पत्नीस संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती दिली. मयताच्या पायावर जखमा आढळून आल्या आहेत. मात्र शवविच्छेदनानंतरच खरे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली.