...तर अनेकांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंचा सूचक इशारा
By विजय.सैतवाल | Updated: October 23, 2022 17:36 IST2022-10-23T17:36:24+5:302022-10-23T17:36:38+5:30
पुणे येथील कृषी महाविद्यालय जमीन प्रकरणानंतर अनेकांचे पितळ उघडे पडणार, भोसरी जमीन प्रकरणातील तक्रारदाराशी अनेकांचे हितसंबंध, गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला

...तर अनेकांचे पितळ उघडे पडणार; राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंचा सूचक इशारा
विजयकुमार सैतवाल
जळगाव : भोसरी येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात तक्रारदार असलेले हेमंत गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन हडपण्याचा उद्देश आपण हाणून पाडला. या व्यक्तीशी अनेक राजकारण्यांचे हितसंबंध आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालय जमीन प्रकरण उघड झाल्यास राज्यभरातील अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला.
रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भोसरी येथील जमीन खरेदी-विक्री प्रकरणासंदर्भात बोलताना गावंडे यांनी का तक्रार दिली, याविषयीदेखील माहिती दिली. ते म्हणाले की, गावंडे यांचा पुणे कृषी महाविद्यालयाची जमीन हडपण्याचा डाव होता. त्यावेळी आपण विरोधी पक्ष नेते असताना विधीमंडळात आवाज उठविला. त्यानंतर सरकार बदलले व माझ्याकडे कृषी खाते आले व या संदर्भात महाविद्यालयाच्या अधिष्ठांतांना तक्रार देण्यास सांगितली. त्यानुसार गावंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यामुळेच त्यांनी भोसरी प्रकरणाशी आपला संबंध जोडला.
गावंडे यांना सरकारमधील अनेकांचे समर्थन असून जमीन हडपण्याचे काम त्यांच्याकडून केेले जाते, असा आरोप त्यांनी केला. गावंडे यांच्याशी हितसंबंध असलेल्यांमध्ये अनेक मोठे नावं आहे. पुणे कृषी महाविद्यालयाचे जमीन प्रकरण उघड झाल्यास अनेक राजकारण्यांचे पितळ उघडे पडू शकते, असा दावादेखील त्यांनी केला.